पिंपरी-चिंचवडमधील डीपी रद्द मोर्चा आणि स्थानिक नेतृत्वाच्या कार्यशैलीवर कष्टकरी जनता आघाडीची टीका

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित विकास आराखडा (डीपी) रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चाचे उद्दिष्ट सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न मांडणे आणि डीपी रद्द करण्याची मागणी करणे हे होते. तथापि, या मोर्चामध्ये स्थानिक नेतृत्वाने केवळ स्वतःचे वैयक्तिक हित साधण्यासाठी आणि राजकीय प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप कष्टकरी जनता आघाडीचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे.
डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरातील डीपी रद्द करण्याच्या मागणीसाठी अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी दीर्घकाळापासून प्रयत्न केले असून, यासंदर्भात कष्टकरी कामगार पंचायत, महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्यासह अनेक संघटनांनी महानगरपालिकेकडे हरकती नोंदवल्या आहेत. या प्रश्नावर सर्वसमावेशक आणि एकजुटीने लढा देणे आवश्यक असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने, विशेषतः शहराध्यक्ष योगेश बहल यांनी, इतर संघटनांना आणि समविचारी पक्षांना सोबत न घेता केवळ स्वतःच्या राजकीय छबीसाठी हा मोर्चा आयोजित केला. परिणामी, हा मोर्चा अपेक्षित लोकसहभागाविना अपयशी ठरला आणि शहरातील सामान्य जनतेने याकडे पाठ फिरवली.
डॉ. बाबा कांबळे यांनी पुढे नमूद केले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक संघटनांसोबत चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान, कष्टकरी जनता आघाडीने पक्षाला पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर आणि असंघटित कामगार यांच्यासह सर्वसामान्य कष्टकरी वर्गाने राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला सत्तेत आणण्यासाठी मतदान केले. मात्र, सत्तेत आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेतृत्वामध्ये केवळ नेतृत्वाच्या स्पर्धेला प्राधान्य मिळाले असून, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या दुर्लक्षित झाल्या आहेत.
डॉ. बाबा कांबळे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, स्थानिक नेतृत्वाने सर्वसामान्य नागरिकांना आणि सामाजिक संघटनांना विश्वासात न घेता केवळ स्वतःचे राजकीय हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षाला यश मिळवून देण्यासाठी स्थानिक नेतृत्वाने सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे.
या सर्व मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पिंपरी-चिंचवडमधील सत्य परिस्थिती आणि सर्वसामान्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती देण्याचा निर्णय कष्टकरी जनता आघाडीने घेतला आहे. डॉ. बाबा कांबळे यांनी सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांना एकत्र येऊन डीपी रद्द करण्याच्या मागणीसाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे.








