ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा-टॅक्सींचा ‘बंद’ १००% यशस्वी; शहराची चाके थांबली! बेकायदेशीर बाईक टॅक्सी व ‘मुक्त परवाना’ धोरणाविरोधात रिक्षा चालकांचे तीव्र निदर्शने

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांच्या न्याय्य हक्कांसाठी ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र विभाग), महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा ब्रिगेड, आणि ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुकारण्यात आलेला राज्यव्यापी रिक्षा-टॅक्सी बंद आज, ९ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्के (१००%) यशस्वी झाला. दुपारी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील रिक्षा-टॅक्सी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांची तात्पुरती गैरसोय झाली.
लाखो चालकांनी आपल्या ‘अस्तित्वाच्या लढ्याकडे’ शासनाचे लक्ष वेधण्याचा हा निर्णायक प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. कष्टकऱ्यांचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात पिंपरी-चिंचवडमधील हजारो रिक्षा चालक-मालक सहभागी झाले होते.
पिंपरीत आंदोलन कार्यक्रम.
सकाळपासूनच शहरात रिक्षा-टॅक्सी सेवा बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (पिंपरी) येथे रिक्षा चालक-मालकांनी एकत्र येत शांततापूर्ण निदर्शने केली. ‘मुक्त रिक्षा परवाना बंद करा!’, ‘बाईक टॅक्सी बंद करा!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
निदर्शनानंतर युवाध्यक्ष शुभम तांदळे, रिक्षा ब्रिगेड प्रमुख अनिल शिरसाठ, जिल्हा कार्याध्यक्ष जाफरभाई शेख, शहर कार्याध्यक्ष विशाल ससाणे आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सिद्धार्थ साबळे, सलीम पठाण, उमाकांत शिंदे, पप्पू वाल्मिकी, अक्षय गायकवाड, दत्ता गिले, मयूर अडागळे, बापू कांबळे, विजय जावळे आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
प्रशासनाकडून आश्वासनाची नोंद
आंदोलनस्थळी पिंपरी-चिंचवड शहराचे मोटर वाहन निरीक्षक आदित्य जाधव व विजय चौधरी यांनी उपस्थित राहून रिक्षा चालकांचे निवेदन स्वीकारले. हे निवेदन तात्काळ मंत्रालय, मुंबई येथे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, संत तुकाराम नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार साहेब यांनाही अनधिकृत स्टँड्स, ट्रॅफिक जाम आणि अवैध बाईक टॅक्सीच्या स्थानिक समस्यांवर निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षकांनी या विषयांवर सकारात्मक चर्चा करून निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल असे सांगितले.
‘प्रवासी कमी रिक्षा जास्त’:
डॉ. बाबा कांबळे यांचे मत
यावेळी डॉ. बाबा कांबळे म्हणाले, “रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. ‘प्रवासी कमी, रिक्षा जास्त’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टू-व्हीलर टॅक्सीला आमचा तीव्र विरोध आहे. या प्रश्नांबाबत परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाली, परंतु त्या बैठकीत रिक्षा चालकांच्या मुख्य प्रश्नांवर चर्चा झाली नाही, यामुळे रिक्षा चालकांमध्ये नाराजी आहे. परिवहनमंत्र्यांनी चर्चा सुरू केल्यामुळे, पूर्ण दिवसाचा बंद न करता अकरा ते पाच असा आम्ही बंद केला आहे. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.”असे डॉ बाबा कांबळे, म्हणाले.
प्रमुख मागण्या: ‘मुक्त परवाना’ व बाईक टॅक्सीला तीव्र विरोध
चालक-मालकांच्या मते, मुक्त परवाना धोरणामुळे बाजारात वाहनांची प्रचंड गर्दी वाढली असून, पारंपरिक चालकांच्या उदरनिर्वाहाचा हक्क धोक्यात आला आहे. या आंदोलनात प्रामुख्याने पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या:
* ‘मुक्त परवाना’ (Open Permit) धोरणावर तात्काळ व कायमस्वरूपी बंदी.
* बेकायदेशीर टू-व्हीलर बाईक टॅक्सीवर संपूर्ण व तात्काळ बंदी.
* रिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची त्वरित स्थापना (आरोग्य विमा, पेन्शन, अपघात विमा यांसारख्या सामाजिक सुरक्षांसाठी).
* ओला-उबर (Aggregators) प्लॅटफॉर्मवरील दरांचे नियमन: किमान दर (उदा. रिक्षा: ₹१७/किमी) निश्चित करून चालकांचे शोषण थांबवावे.
* CNG बॉटल टेस्टिंग शुल्क पुन्हा ₹५०० प्रति वर्ष करावे.
युवा अध्यक्ष शुभम तांदळे यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत या मागण्यांवर शासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालक शांत बसणार नाहीत.” शासनाने आमचे प्रश्न तातडीने सोडवावेत, परिवहन क्षेत्रातील होणारे बदल हे रिक्षा चालक-मालकांच्या अस्तित्वाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तात्काळ उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी, अशी मागणी यावेळी शुभम तांदळे यांनी केली.













