Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कष्टाशिवाय ध्येय साध्य होत नाही!’ असा कानमंत्र संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल शेटे यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका, संत तुकारामनगर, पिंपरी येथे  स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना दिला.

ग्रंथालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त लांडे, महेंद्र बाविस्कर, नीलेश अष्टेकर, सचिन अहिरराव आणि सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची विशेष उपस्थिती होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अतुल शेटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून अहिल्यादेवी होळकर यांच्या देदीप्यमान कारकिर्दीविषयी माहिती देऊन स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीबद्दल वेगवेगळ्या टीप्स देताना, ‘आईवडील तुम्हाला मोठ्या कष्टाने पैसे पाठवीत असतात. त्याचा योग्य तो विनियोग करा, अभ्यासात सातत्य ठेवा, कष्टाशिवाय काहीही साध्य होत नाही हे लक्षात ठेवून शॉर्टकट निवडू नका, यश तुमचेच आहे!’ असे प्रतिपादन केले. उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगतातून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून स्पर्धा परीक्षांची आत्मविश्वासपूर्वक तयारी करता येईल, इतपत ग्रंथालय समृद्ध असल्याने त्याचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन केले. नंदू कदम यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश घाडगे यांनी आभार मानले. याप्रसंगी स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आदी  उपस्थित होते.

 

Share.
Leave A Reply

Exit mobile version