अरविंद एज्युकेशन सोसायटीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जुनी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी गुरूपूजन व पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
सरस्वती व व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका इशिता परमार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका सीमा हवालदार, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरूजनांचे व आई-वडिलांचे मोठ्या सन्मानाने पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी आपल्या आई-बाबांसाठी सन्मानपट्ट्या बनवल्या. आईसाठी वात्सल्यसिंधू आई व बाबांसाठी प्रेरणादायी बाबा’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पालकांचे गुरुमंत्राच्या संगीतमय वातावरणात पाद्यपूजन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी रंगीत खडूने रंगभरण उपक्रम घेण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि आपली कला सादर केली. पहिली ते दहावी यांच्यासाठी श्लोक व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
आरती राव म्हणाल्या, की व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचे स्थान खूप उच्च दर्जाचे व महत्त्वाचे असते. तसेच विद्यार्थ्यांसाठी मोबाईल, लॅपटॉप जे कोरोना काळात गुरू इतकेच महत्त्वाचे ठरले, म्हणजे ते विद्यार्थ्यांचे स्मार्ट गुरु झाले. यांचे देखील पूजन करून कृतज्ञता व्यक्त केले. प्रणव राव यांनी प्रथम गुरु आपले आई – वडील म्हणून त्यांचा नेहमीच मान राखला पाहिजे, असे आवाहन केले. शिक्षिकांनी विद्यार्थ्यांकडून गुरूविषयी महत्त्व सांगणारी प्रतिज्ञा म्हणून घेतली. गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.
आपल्या आयुष्यामध्ये आई- वडील, शिक्षक हे आपले गुरु आहेत. त्याचप्रमाणे निसर्ग हा देखील आपला मोठा गुरु आहे. योग्य रस्ता दाखविण्याचे काम गुरु करीत असतात, अशा शब्दात मुख्याध्यापिका नीलम पवार, आशा घोरपडे, इशिता परमार, प्राचार्य शीतल मोरे यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मराठी, हिंदी या दोन्ही भाषेतील हस्ताक्षर स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवून दिले.













