ताज्या घडामोडीपिंपरी

अखेरच्या क्षणी एबी फॉर्म, राष्ट्रवादीला धक्का; अपर्णा डोके यांच्या भाजप प्रवेशाने चिंचवडगाव तापला

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडगावातील राजकारणाला ऐन उमेदवारी अर्जाच्या अंतिम टप्प्यात मोठा धक्का देणारी आणि सत्तासमीकरणे बदलणारी घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या आणि माजी महापौर म्हणून तीन टर्म नगरसेवक राहिलेल्या अपर्णा डोके यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश करत निवडणूक रणांगणात उडी घेतली. विशेष म्हणजे, पक्षांतर्गत तीव्र विरोध असूनही भाजप नेतृत्वाने अखेरच्या क्षणी त्यांना अधिकृत एबी फॉर्म देत उमेदवारी निश्चित केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षित धक्का बसला आहे.

चिंचवडगाव हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असताना, या प्रभागातून भाजपने यावेळी चार उमेदवारांची रणनीती आखली आहे. माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, अपर्णा डोके आणि योगेश चिंचवडे यांच्या पत्नी यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक गोटात अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. आमदार शंकर जगताप यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक राजू गावडे तसेच शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांना डावलण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
अपर्णा डोके या सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या अनुभवी नेत्या आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी त्यांची निष्ठा आणि राजकीय बांधिलकी सर्वश्रुत आहे. विकासकामांचा ठसा, प्रभावी लोकसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड यामुळे त्यांनी चिंचवडगावात सातत्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा केवळ पक्षांतर न राहता, आगामी निवडणुकीतील समीकरणे बदलणारा निर्णायक टप्पा मानला जात आहे.

एकीकडे भाजपने राष्ट्रवादीला धोरणात्मक चकवा देत ताकद वाढवली असली, तरी दुसरीकडे अंतर्गत नाराजी, नाकारलेली नावे आणि अस्वस्थ कार्यकर्ते हे भाजपसमोरचे मोठे आव्हान ठरणार आहेत. चिंचवडगावात आता केवळ पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक राजकारण, व्यक्तिमत्त्वे आणि अंतर्गत संघर्ष यांचा निर्णायक प्रभाव दिसून येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button