ताज्या घडामोडीपिंपरी
अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या उपक्रमात लहानग्यांची दंगामस्ती
बालदिनानिमित्त आयोजित ‘धमाल नगरी’ कार्यक्रमास प्रभाग 15 मधील बालचमुंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जादू, खेळ, पपेट शो आणि खाद्य स्टॉल्समुळे कार्यक्रमाला रंगतदार स्वरूप…
प्राधिकरण (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बालदिनाचे औचित्य साधत अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आयोजित ‘धमाल नगरी’ या भव्य कार्यक्रमाने परिसरात आनंदाचा जल्लोष निर्माण केला. मुलांसाठी खास आखलेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत, कार्यक्रम भरभरून यशस्वी झाला. कुटुंबासह सहभागी झालेल्या मुलांनी दिवसभर विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमात आकर्षक जादूचे प्रयोग, पपेट शो, मजेदार खेळ, कला-स्पर्धा, तसेच मुलांसाठी खास खाद्यव्यवस्था यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले. प्रत्येक स्टॉलवर मुलांची गर्दी पाहायला मिळत होती. सुरक्षित आणि उत्तम नियोजनामुळे पालकांनीही हा उपक्रम कौतुकास्पद ठरल्याचे सांगितले.
यावेळी माजी उपमहापौर शैलजा अविनाश मोरे यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले. तर भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी बालदिनाचे महत्त्व पटवून देत, मुलांच्या विकासासाठी असे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांच्या पुढाकारामुळे ‘धमाल नगरी’ मुलांसाठी अविस्मरणीय आणि सकारात्मक अनुभव ठरला.
उपस्थित पालक, नागरिक आणि मुलांनीही कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानत पुढील काळातही असे उपक्रम आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.




















