प्रभाग क्रमांक १५ निगडी प्राधिकरणात ‘अवघाचि विठ्ठलू’मुळे चैतन्यमय वातावरण
अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषाने प्रेक्षागृह दुमदुमले
प्राधिकरण (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी एकादशीनिमित्त अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १५ निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर सभागृहात ‘अवघाचि विठ्ठलू’ हा भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक रंगांनी सजलेला अध्यात्मिक सोहळा उत्साहात संपन्न झाला.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांना अभंग व भक्तीगीतांचा सुरेल असा आस्वाद घेता येतो. यंदाही भक्ती-संगीताची ही परंपरा सुरू ठेवण्यात आली. आषाढी एकादशीचा हा उत्सव भक्ती, प्रेम, एकता आणि संस्कृतीचा मनाला भिडणारा अनुभव ठरला. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषाने प्रेक्षागृह दुमदुमून गेले होते.
प्रारंभी सावळ्या विठ्ठलाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी उपमहापौर शैलजाताई मोरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मधुर गायन, सुरेल वादन, मनमोहक नृत्य आणि आकर्षक चित्रकलेने परिसर सजवण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, उत्साही युवा पिढी, आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या सुंदर सोहळ्यात जणू पंढरपूरची वारीच इथे अवतरल्यासारखी अनुभूती निर्माण झाली होती.
एकापेक्षा एक गीतांना रसिकांची दाद…
यावेळी भक्तीगीतांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. गायन कलाकारांनी आपल्या गीतांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. ‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजराने सुरुवात झाली. उठी उठी गोपाळा ही भूपाळी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, रुणुझुणू रुणुझुणु रे भ्रमरा, आबिर गुलाल, अमृताहुनी गोड अशा एकापेक्षा एक गीतांना रसिकांनी चांगलीच दाद दिली. देव माझा विठू सावळा, निजरूप दाखवा हो, खेळ मांडीयेला वाळवंटी ठायी आदी गीतांना वाहव्वा मिळाली. मध्यंतरानंतर पद्मनाभा नारायणा, मला हे दत्तगुरु दिसले, मोगरा फुलला, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे आदी गीते झाली. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ही आरती, ज्ञानेश्वर माउलींचा गजर, घालीन लोटांगण व बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल या उपसंहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.












