महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अर्थसंकल्प २०२६–२७ अधिक लोकाभिमुख करण्यासाठी जास्तीतजास्त अभिप्राय नोंदवण्याचे उपायुक्त अण्णा बोदडे यांचे आवाहन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून पिंपरी चिंचवड महापालिका दरवर्षी अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांचे अभिप्राय व सूचना विचारात घेते. त्या अनुषंगाने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ हा उपक्रम महापालिकेने हाती घेतला असून या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन अर्थसंकल्प २०२६-२७ साठी जास्तीतजास्त अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयातील सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपायुक्त अण्णा बोदडे बोलत होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवडकर, शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. रूपाली कुदरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. काजल महेश्वरी आदी उपस्थित होत्या.
उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले, ‘भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील राहण्यायोग्य उत्तम असणाऱ्या शहरांमध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा समावेश झाला आहे. शहरातील पायाभूत सुविधा, औद्योगिक उपलब्धता, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक वाहतूक सुविधा शहराच्या प्रगतीला गती देत असतात. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पिंपरी चिंचवड शहरात नागरिक कामानिमित्त येत असतात. त्यातील बहुतांश नागरिकांचा पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक होण्याकडे कल वाढला असून सध्या शहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. या शहराचा विकास वेगाने होत असून या विकासाला आकार देण्यात नागरिकांना सक्रिय सहभागी होता यावे, यासाठी महापालिकेने ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात जास्तीतजास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, तरुणांनी सहभागी व्हावे,’ असेही उपायुक्त बोदडे म्हणाले.
विविध उपक्रमांची विद्यार्थ्यांना दिली माहिती
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती उपायुक्त बोदडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. ते म्हणाले, ‘महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ ॲप निर्माण करण्यात आले आहे, ज्यावर महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती व संपर्क साधण्याची सोय उपलब्ध आहे.’ यावेळी उपायुक्त बोदडे यांनी हरित सेतूसह विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या उपक्रमांत सहभागी होऊन अभिप्राय कसा नोंदवावा, याची माहिती देखील दिली.
असा नोंदवा अभिप्राय*
नागरिकांना महापालिकेच्या pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरून अभिप्राय नोंदवता येईल.
तसेच नागरिक या https://www.surveymonkey.com/r/D8TBZRH लिंकला भेट देऊन ऑनलाईन अभिप्राय नोंदवू शकतात.
पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप डाउनलोड करून तेथेही नागरिकांना अभिप्राय नोंदवता येईल.
…….













