ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

‘लाडक्या बहिणींनाच नाट्यगृह हवं आहे’, असं दादांना सांगा, म्हणजे नाट्यगृहाला लवकर निधी मिळेल : मकरंद अनासपुरे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Spread the love

तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- तळेगावकरांची नाट्यगृहाची मागणी पूर्ण होणे अवघड नाही. ‘तळेगाव दाभाडेमधील लाडक्या बहिणींनाच नाट्यगृह हवं आहे’, असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना सांगा म्हणजे लवकर निधी मिळेल, अशी मिश्किल टिपणी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली. दरम्यान, जगभरातील दहशतवाद्यांच्या धर्माविषयी कल्पना काढून टाकून त्यांचा ब्रेनवॉश करण्याचे ईश्वराला साकडे घालतो, असेही अनासपुरे म्हणाले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे तळेगाव दाभाडे शाखेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेते अनासपुरे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात नांदी, गणेश वंदना व मैत्र यमन रागात सादर झालेल्या सतार वादनाने झाली. दरम्यान, यंदाचा कलागौरव पुरस्कार हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रसाद खांडेकर यांना, प्रसिद्ध सतार वादक विदुर महाजन यांना जीवन गौरव पुरस्काराने, तर प्रा. नितीन फाकटकर यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शेळके, प्रगतशील शेतकरी सुनील जाधव, नंदकुमार वाळंज, नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर, संचालक सुरेश दाभाडे, विलास काळोखे, तेजस धोत्रे, नंदकुमार वाळुंज, राजेश बारणे, संजय चव्हाण, सुनील जाधव, गणेश खांडगे, कृष्णा कारके, हरिश्चंद्र गडसिंग, दादासाहेब उऱ्हे, चंद्रकांत भिडे आदी उपस्थित होते.
अभिनेते अनासपुरे म्हणाले, की पुरस्कार प्रदान केलेल्यांची तपश्चर्या, शिस्त वाखाणण्याजोगी आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांना धडपडताना जवळून पाहिले आहे. तळेगाव दाभाडे शहर सुसंस्कृत व राहण्यास वातावरण पोषक असल्याने इथे घर घेण्याचा विचार असल्याचेही अनासपुरे यांनी सांगितले.
आमदार सुनील शेळके म्हणाले, की नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेची वीस वर्षाची वाटचाल वखाणण्याजोगी आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची कला नाट्य परिषदेने जपली आहे. तळेगाव दाभाडे शहरात नाट्यगृहासाठी आपण आग्रही असून, आपल्या कार्यकाळात नाट्यगृहाचे काम तडीस नेण्याचा संकल्प आहे. त्यासाठी येत्या जून-जुलैमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याचा शब्द दिल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना महाजन म्हणाले, ‘जिना यहाँ, मरना यहाँ’, असे तळेगावबद्दल वाटते. मावळातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत सतार हे वाद्य पोहोचविण्याचा संकल्प आहे.
अभिनेत्री नम्रता संभेराव म्हणाल्या, कामात नेहमी वैविध्य असावे, याकडे कटाक्ष असतो. मी विनोदी भूमिका करीत असले, तरी मी जास्त भावनिक आहे. आयष्यभर रसिकांचे मनोरंजन करीत राहील, असा विश्वास देते.

अभिनेते प्रसाद खांडेकर म्हणाले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुख्य शाखा शंभरावे वर्ष साजरे करीत आहे. तर तळेगाव शाखा विसावे वर्ष साजरे करीत असताना हा पुरस्कार मिळणे, हे आनंददायी आहे. मकरंद अनासपुरे यांना आपला या क्षेत्रातला प्रवास शून्यातून पाहिला असल्याने त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे, हे आपले भाग्य आहे.
सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविकात सांगितले, की तळेगाव दाभाडे शहरात कलाकारांची खाण आहे. त्यामुळे लवकरात लवकर तळेगावकर रसिकांच्या सेवेत नाट्यगृह आणण्याचा प्रयत्न असून, राजकीय इच्छाशक्तीच यासाठी कामी येणार आहे. आमदार शेळके यांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी, तर आभार नितीन शहा यांनी मानले.
डॉ मिलिंद निकम, संग्राम जगताप, अमित बांदल, तानाजी मराठे, अशोक जाधव, नयना डोळस, दिपाली पाटील, युगंधर बढे, मीनल रणदिवे, सुमेध सोनवणे, राजेश बारवे, संजय मेहता, भूषण गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button