ज्ञानेश्वरी ग्रंथ छपाईस १ कोटी रुपयांचा निधी देणार :- उदय सामंत यांची घोषणा
पवना - इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार राज्यातील सर्व जिल्ह्यात कीर्तन महोत्सव उपक्रम

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संत साहित्य, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सर्वाना सहज अल्पदरात उपलब्ध व्हावी. यासाठी आळंदी देवस्थानला ग्रंथराज ज्ञानेश्वरी छपाईस १ कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देत आहे. मराठी भाषा विभागाचे वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. पावन , इंद्रायणी नदीचे वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी उदयॊजकांचे सहकार्याने शासनाचे माध्यमातून नद्या प्रदूषण मुक्त करणार असल्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी आळंदी येथे केली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि आळंदी ग्रामस्थ आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अंतर्गत कीर्तन महोत्सवास उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी भेट देऊन आळंदी मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. या निमित्त आयोजित कीर्तना नंतर ते मार्गदर्शन करताना बोलत होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या भक्तिमय उत्साहात झाले. पहिल्या सत्रातील कीर्तनात ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर यांच्या हृदयस्पर्शी अमृतवाणीने कीर्तन सेवा रुजू झाली. यावेळी भाविकांना कीर्तन श्रवणाची पर्वणी लाभली.
मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंतजी यांनी वारकरी संप्रदायाचे जिव्हाळ्याचा इंद्रायणी नदी प्रदूषित झालेला विषयावर त्यांनी संवाद साधत भाविक, नागरिकांना आश्वस्त केले. ते म्हणाले, इंद्रायणी आणि पवना नदीच्या जल शुद्धीकरण प्रकल्पास गती देण्याचे काम झालेले आहे. उद्योग विभागाचे माध्यमातून पुढील वर्षभरात पवना, इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्यात येतील. यासाठी उद्योगांचे सहकार्य घेतले जाईल.
शासनाचे माध्यमातून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी छपाईसाठी १ कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. संत साहित्य घराघरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांनी आळंदी मंदिरासह अखंड हरिनाम सप्ताहात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. आळंदी मंदिरात तसेच सप्ताहात देवस्थान व आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने त्यांना सन्मान करण्यात आला. पवना आणि इंद्रायणी नदी जलप्रदूषण मुक्त करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जबाबदारी घेतली. इंद्रायणी नदी उद्योग खात्याचे माध्यमातून प्रदूषण मुक्त करण्यास गती देण्यात येईल यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामकाज सुरू केले जाईल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या. जन्मोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षात ७५१ व्या जन्मोत्सवी वर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यात कीर्तन महोत्सव सुरू केला जाईल. यात वारकरी संप्रदायाचे देखील सहकार्य घेतले जाईल. असे सांगत वारकरी संप्रदायाशी मार्गदर्शन करताना त्यांनी संवाद साधला.
यावेळी आळंद देवस्थानचे पदाधिकारी यांनी ज्ञानभूमी प्रकल्पाची माहिती दिली. सुमारे ४५० एकर जागेत साकारणारा हा प्रकल्प अनेक अर्थांनी नाविन्यपूर्ण असून, वारकऱ्यांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत मंत्री सामंत यांनी व्यक्त केले. आळंदी देवस्थानच्या ज्ञानभूमी प्रकल्पास शासना कडून निधी देण्यास पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी ७५१ व्या जन्मोत्सव वर्षाच्या निमित्ताने वारकरी आणि शासन सुसंवाद ठेवेल. त्याच प्रमाणे या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कीर्तन महोत्सव आयोजित करील अशी ग्वाही त्यांनी दिली.
दिवसभरातील कार्यक्रमात भागवत महाराज शिरवळकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा, यशोधन महाराज साखरे यांची प्रवचन सेवा,जयवंत महाराज यांचे कीर्तन तसेच महादेव शहाबाजकार यांची संगीत भजन सेवा भाविकांची दाद देऊन गेली. अखंड हरिनाम सप्तहास राज्यातून हजारो भाविक आळंदीत आले असून आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, आळंदी ग्रामस्थ यांचे माध्यमातून भाविकांना विविध सेवा सुविधा देण्यात आल्या असून कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याचे सूचना मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रशासनास दिल्या आहेत. सोहळा काळात वाहतूक सुरळीत आणि कायदा शांतता सुव्यवस्था कायम राहावी यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे, वाहतूक पोलीस विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे परिश्रम पूर्वक दक्षता घेत आहेत. यावेळी माजी आमदार विलास लांडे, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण, आळंदी देवस्थानचे विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, निलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, देवस्थानचे व्यवस्थापन माउली वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक आदी उपस्थित होते.













