आळंदीत आज विविध विकास कामांचे भूमिपूजन – उद्घाटन समारंभ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची उपस्थिती

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी प्राप्त निधीतून आळंदी येथील आरक्षित भक्त निवासच्या जागेत भक्तनिवास सह आळंदीत विविध विकास कामांचे भूमिपूजन, घाटाचे नूतनीकरण, आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सवलत प्रतीचे प्रकाशन रविवारी ( दि. २६ ) सकाळी ११ वाजता आळंदीत होणार आहे. या निमित्त फ्रुटवाले धर्मशाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदींच्या उपस्थितीत सभेचे आयोजन आळंदी देवस्थानने केले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्त आळंदी नगरपरिषद आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी नागरिक, वारकरी, भाविक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या विविध विकास कामांच्या समारंभास पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित राहणार आहेत.
आळंदी नगरपरिषदेने भक्त निवासाचे आरक्षण विकास आराखड्यात ठेवले होते. हे आरक्षण विकसित करण्यासाठी आळंदी ग्रामस्थ व आळंदी देवस्थान यांनी वेळोवेळी शासनाकडे भक्त निवास बांधकामासाठी निधी मंजूर करण्यासह अनेक वेळा मागणी करून पाठपुरावा केला होता. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षातील उपक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्त निवास बांधकामासाठी २५ कोटी रुपयांचे निधीची घोषणा करीत निधी देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार राज्याच्या नगरपरिषदांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजा साठी विशेष अनुदान देण्याचे धोरण नगर विकास विभागाच्या माध्यमातून पहिला टप्पा म्हणून दहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. भक्त निवास इमारत महाराष्ट्र शासनाच्या अर्थात आळंदी नगरपरिषदेने अनेक वर्षांपूर्वी भक्त निवास म्हणून आरक्षित ठेवली होती. त्याच जागेत बांधकाम करण्यात येणार आहे. राज्यातून येणाऱ्या भाविकांचे रहाण्याची सोय या मुळे होणार आहे. आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून हे भक्त निवास पुढे चालविले जाणार आहे.
या शिवाय मंदिर परिसरातील जुन्या दगडाचे घाटाचे नूतनीकरण, मजबुतीकरण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. यात माऊली मंदिरा पासून महाद्वार ते शनी मारुती मंदिर, मंदिराचा पान दरवाजा परिसर, श्री राम घाट विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाच्या माध्यमातून आळंदी नगरपरिषदेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून घाटाच्या विकासाचे देखील भूमिपूजन रविवारी आळंदीत होणार आहे.
भाविकांना सवलतीच्या दरात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत मिळावी. यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी एक कोटी रुपये छपाई अनुदान श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ छपाईसाठी शासना कडून उपलब्ध करून दिले आहे. या निधीतून श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत भाविकांना सवलतीचे दरात अगदी पन्नास रुपये मध्ये मिळणार आहे. या श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रतीचे ही प्रकाशन या वेळी होणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी नगरपरिषद यांनी या उपक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या शिवाय मंदिरात अनेक सेवाभावी संस्था भाविक, नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देत असतात. त्याच माध्यमातून रुग्ण तपासणी केंद्राचे उद्घाटन याच उपक्रमात होत आहे. आळंदी मंदिरात विविध सेवाभावी संस्था रुग्ण तपासणी सेवा केंद्रच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा, सल्ला, औषध वाटप मोफत करीत असतात. याच सेवेत आता आळंदीतील के.के.रुग्णालय देखील सहभागी झाले. त्यांचे माध्यमातून सेवेचे उदघाटन देखील या कार्यक्रमात केले जाणार असल्याचे आळंदी देवस्थानने कळविले आहे.




















