आळंदीत विश्व प्रार्थना माऊलींचे पसायदान फलकाचे लोकार्पण
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगातील सुख, शांती, समाधानाचा संदेश सर्वश्रेष्ठ विश्व प्रार्थना माऊलींचे मागणे अर्थात पसायदान होय. विश्वातील सर्व सुखाच्या शिखरावर विराजमान व्हावे, सर्वानी सत्कर्मात रमावे, या साठी विश्वात्मक देवास माऊलींनी केलेली प्रार्थना म्हणजेच विश्व प्रार्थना पसायदान या पसायदान कोनशिलेचे इंद्रायणी नदी घाटावर अनावरण करीत लोकार्पण हरिनाम जयघोषात करण्यात आले. यातून संत साहित्याचा प्रचार प्रसार उपक्रम जनजागृती आणि सेवा कार्यातून राबविला जात आहे.
अलंकापुरीतील इंद्रायणी आरती सेवा समिती संयोजक राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, संयोजक आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, माजी नगरसेविका उषाताई नरके, अनिता शिंदे, सरस्वती भागवत, ताई देवरे, रुख्मिणी कदम, नीलम कुरधोंडकर, शैला तापकीर, ह.भ.प. विश्वकर्मा महाराज पांचाळ, ईश्वर मेदगे, रोहिदास कदम बाबासाहेब भंडारे, राजेश नागरे आदी उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवा निमित्त आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदी यांचे वतीने पसायदान कोनशिला हरिनाम गजरात पूजा, पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन करून लोकार्पण करण्यात आले. इंद्रायणी नदीचे तसेच घाट परिसराचे पावित्र्य जोपासण्यासाठी जनजागृती इंद्रायणी आरती सेवा समिती नियमित करत आहे. या माध्यमातून नित्यनैमित्तीक दर एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता आणि इंद्रायणी आरती, शासकीय स्तरावरून नदी प्रदूषण मुक्त व्हावी. यासाठी पाठपुरावा करण्याचे कार्य देखील समितीचे वतीने केले जात आहे. नद्यांचे पावित्र्य जोपासण्याचे या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी अनिताताई झुजम यांनी केले. श्री विठ्ठल रुख्मिणी संप्रदाय चॅरिटेबल ट्रस्ट सचिव विठ्ठल गायकवाड, संचालक बाळासाहेब कड, अमर गायकवाड यांनी पसायदान नामफलक इंद्रायणी आरती सेवा समितीस सुपूर्द केला. पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता हरिनाम गजरात झाली. संयोजन अनिताताई झुजम, आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी केले.








