कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटते!; का म्हणाले असे उपमुख्यमंत्री अजित पवार?

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदी सुशोभीकरणासाठी अडथळा ठरणारी एक हजार झाडे तोडण्यात येणार असून, पालकमंत्री म्हणून ती रोखावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली असता उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार चिडले. ‘कोणीही उठतो, उपदेश करतो. सर्व मक्ता मीच घेतला आहे. हे सगळे ऐकल्यावर कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटते,’ अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.
चिंचवड येथे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, वनांसाठी काम करणारे आसाम येथील जाधव पायांग या वेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण संपत असताना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पवार यांना वृक्षतोड थांबविण्याबाबत विनंती केली. ते म्हणाले, ‘पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी सुशोभीकरणासाठी हजारो झाडे तोडली जाणार आहेत. दुर्गादेवी टेकडीवरील झाडेही तोडली जाणार आहेत. एमआयडीसी क्षेत्रासह शहरात प्रचंड वृक्षतोड सुरू आहे. आपण पालकमंत्री आहात. पालकमंत्री म्हणून शहरात होणारी वृक्षतोड थांबवावी.’ त्यावर, ‘हे सगळे ऐकल्यानंतर कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, असे मला वाटायला लागले आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश करतो. सगळा मक्ता मीच घेतलेला आहे. यांनी केवळ उपदेश करायचा आहे,’ असे म्हणून पवार यांनी प्रस्तावित वृक्षतोडीवर बोलणे टाळले.








