ताज्या घडामोडीपिंपरी

अहिल्यादेवींनी महिला सबलीकरणाचा पाया रचला :- आमदार चित्रा वाघ

'अहिल्या पुरस्कार २०२५' सोहळा दिमाखात संपन्न; विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव

Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “आजच्या पिढीतील महिलांसाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक दीपस्तंभ आहेत. त्यांनी केवळ न्यायप्रिय शासिका म्हणूनच नव्हे, तर एक कुशल प्रशासक आणि समाजसुधारक म्हणूनही आपले कार्य सिद्ध केले. त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही आपल्याला विविध क्षेत्रांत दिसतो, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा वाघ यांनी केले.
सखी सोबती फाउंडेशनने अहिल्यादेवींच्या नावाने हा पुरस्कार देऊन, समाजात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला आहे, हे अतिशय कौतुकास्पद आहे. अहिल्यादेवींनी महिला सबलीकरणाचा पाया रचला आणि आजच्या महिलांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विशाल जनसेवेच्या स्मरणार्थ सखी सोबती फाउंडेशनच्या वतीने आयोजित “अहिल्या पुरस्कार २०२५” गौरव समारंभ आज, रविवारी प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पुणे जिल्ह्यातील समाजसेवा, प्रशासन, क्रीडा, संस्कृती आणि स्त्री सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य निलेश गद्रे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, संयोजक तथा माजी नगरसेवक विजय उर्फ शीतल शिंदे, सखी सोबती फाऊंडेशनच्या अध्यक्षा गिरिजा शिंदे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाता पालांडे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नाताई काटे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, वैशाली खाडये, कविता हिंगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना निलेश गद्रे यांनी सांगितले की, “राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या दूरदृष्टीने आणि लोककल्याणाच्या भावनेने राज्यकारभार केला, तो आजही आदर्श आहे. सखी सोबती फाउंडेशनने त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन समाजात विधायक कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे हे अत्यंत स्तुत्य आहे. अहिल्यादेवींचे कार्य हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजही महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देण्यासाठी प्रेरणा देते.”

विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “महिलांना केवळ पुरस्कार देऊन सन्मानित करणे पुरेसे नाही, तर त्यांच्या कार्याला व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहित करणे हे महत्त्वाचे आहे. ‘अहिल्या पुरस्कार’ महिलांच्या या योगदानाला अधोरेखित करतो.”

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे म्हणाले, “आजच्या काळात अहिल्यादेवींच्या विचारांची आणि त्यांच्या कार्याची गरज आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेतली आहे आणि या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला मिळालेली ही पोचपावती आहे.”

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव संयोजक तथा माजी नगरसेवक विजय उर्फ शितल शिंदे यांनी “राजमाता अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करताना आनंद होत असल्याचे सांगत अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात बदल घडवणाऱ्या महिलांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. भविष्यातही असे उपक्रम आम्ही सातत्याने राबवू,” असे ते म्हणाले.

या सोहळ्यात एकूण ९ महिलांना “अहिल्या पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आले. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मशीलता पुरस्कार ह.भ.प. पूनम जाधव (प्रसिद्ध कीर्तनकार) आणि सुनिता आपटे (समाजसेविका) यांना प्रदान करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रजावत्सल पुरस्कार डॉ. कुंदाताई भिसे (संस्थापक अध्यक्ष, उन्नती सोशल फाउंडेशन) यांना, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर न्यायप्रिय शासिका पुरस्कार पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांना दिला गेला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्तीचे प्रतिक पुरस्कार श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या वैष्णवी जगताप यांना प्रदान झाला. याव्यतिरिक्त, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संवेदनशील नेतृत्व पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पागौरी गणपुले, सुनिता भोसले (समाजसेविका), प्राजक्ता खारकर (समाजसेविका) आणि रेखा मराठे (समाजसेविका) यांना देऊन गौरवण्यात आले.

उपस्थित महिलांसाठी चिठ्ठी काढून माहेश्वरी साडी भेट देण्यात आली. तसेच, १० आणि १२ वी च्या ९ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त या सोहळ्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध भरतनाट्यम प्रशिक्षणार्थी सायली काणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर सुप्रसिद्ध लेखिका विनिता तेलंग यांनी प्रबोधनपर व्याख्यान देऊन अहिल्यादेवींच्या कार्याचे विविध पैलू उलगडले.

अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करणे हाच या पुरस्कारामागील मुख्य उद्देश असल्याचे सखी सोबती फाउंडेशनच्या अध्यक्षा गिरिजा शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi