“चिंचवडमध्ये श्रद्धा–सेवेचा संगम; ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा महाप्रसादातून जनसंवाद”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी चिंचवड लिंक रोडवरील गजानन महाराज मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाप्रसाद वाटपाच्या माध्यमातून ॲड. शेडगे यांनी थेट जनतेशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाविषयी मते जाणून घेतली. “राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नव्हे, तर जनतेशी नातं जोडण्याचं माध्यम आहे,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. विकास, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली.
स्थानिक नागरिक, ज्येष्ठ भाविक, महिला व तरुणांचा या उपक्रमाला मोठा पाठिंबा दिसून आला. धार्मिक स्थळी सेवा उपक्रम राबवून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे नागरिकांनी सांगितले. या उपक्रमामुळे प्रभागात ॲड. मोरेश्वर शेडगे यांची जनाधार अधिक भक्कम होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.




















