शासनाच्या हलगर्जीपणाविरोधात अभाविपचे तीव्र आंदोलन – आदिवासी वसतीगृहाच्या सुरक्षा प्रश्नांवर लेखी आश्वासन

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील आदिवासी शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना असुरक्षित आणि हलाखीच्या स्थितीत राहावे लागत असून, या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), पिंपरी चिंचवड महानगर तर्फे आज तीव्र आंदोलन करण्यात आले.
दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री वसतीगृहातील स्लॅब प्लास्टर कोसळल्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये देखील अशीच घटना घडली होती, ज्यात एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली होती. तरीही संबंधित यंत्रणांनी कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने, आज पुन्हा अशी दुर्घटना घडली.
अभाविपने यावर तीव्र आवाज उठवत वसतीगृह प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप करत आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करत खालीलप्रमाणे लेखी आश्वासन दिले:
Structural Audit: वसतीगृहाच्या इमारतीची महिन्याभरात तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल तपासणी केली जाईल.
ठेकेदारावर कारवाई: ऑक्टोबर २०२३ च्या घटनेबाबत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली जाईल.
दुरुस्ती कामे: स्लॅब प्लास्टर दुरुस्तीचे काम दोन दिवसांत सुरू होईल.
गृहपाल चौकशी: गृहपाल मंजुषा वायसे यांच्यावरच्या तक्रारींची चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.
या लेखी आश्वासनांमुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, अभाविपचे महानगर मंत्री हिमांशु नागरे, सहमंत्री कार्तिक पवार, सोहेल शेख व विद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत गावंडे, महेंद्र भोये यांनी प्रशासनाकडून लवकरात लवकर अंमलबजावणी झालीच पाहिजे, असा ठाम इशारा दिला आहे.
या आंदोलनात अभाविपचे अनेक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




















