‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!


पालिकेला मिळाल्या तब्बल १००० पेक्षा अधिक सूचना!



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत पालिकेला तब्बल १००० पेक्षा अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्न, उपाय योजना, प्रकल्प यासाठी अगदी घरबसल्या आपला सहभाग नोंदवता येणार असून नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून “PCMC Sarathi APP” द्वारे अर्ज करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक महाविद्यालयांना भेटी देण्याचे काम सुरु असून त्यांच्या प्रतिनिधींमार्फत प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग'(Participatory Budget) या उपक्रमाचे महत्व समजावून सांगण्यात येत आहे. पालिकेतर्फे रस्ते, उद्यानं, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा कशा पुरवल्या जातात?, त्यासाठीचे आर्थिक निर्णय कसे घेतले जातात?, या सर्व गोष्टींसाठी अर्थसंकल्प कसे आवश्यक असते?, विद्यार्थ्यांना देखील या प्रक्रियेत कशी महत्त्वाची भूमिका बजावता येते, या सर्वांची इत्यंभूत माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची विचार क्षमता वापरायची ही उत्तम संधी असल्याने हे विद्यार्थी वर्गातच तिथल्या तिथे QR कोड स्कॅन करून आपापल्या परिसरातील सुविधा तसेच प्रश्नांबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
या जनजागृती मोहिमेसाठी पालिकेकडून सकाळी कचरा गोळा करणाऱ्या जवळपास ५०० घंटागाड्यांचा देखील प्रभावीपणे वापर केला जात आहे. या गाड्यांमार्फत शहरातील प्रत्येक गल्लीत आणि मोहल्ल्यात ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ या जनजागृती मोहिमेची प्रचार धून ऐकू येत आहे. या घंटागाड्यांमार्फत देखील QR कोड स्कॅन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
विविध औद्योगिक कंपन्या, सरकारी कार्यालये, रुग्णालये यांपासून ते थेट मजूर अड्डे तसेच जन्माष्टमी निमित्त विविध मंदिरांमध्ये होणारी गर्दी, दही हंडी निमित्त रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात उतरणारे नागरिक तसेच पालिकेच्या दर सोमवारी आयोजित केल्या जाणाऱ्या जनसंवाद सभांच्या गर्दीचा देखील प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेण्यात येत आहे. सोशल मीडिया प्रचार तंत्राचा प्रभावी वापर हे देखील या जनजागृती मोहिमेचे वैशिष्ठ्य ठरले असून त्याद्वारे पिंपरी चिंचवड मधल्या तब्ब्ल १५ लाख नागरिकांपर्यंत ही मोहीम पोहोचवण्यात पालिकेला यश आले आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा विकास साधण्यासाठी नागरिकांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. तरी, पिंपरी चिंचवड मधील जास्तीतजास्त नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या मागण्या PCMC Smart Sarathi App द्वारे नोंदवाव्यात, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.








