शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात कठोर उपाय योजना राबवा – भाऊसाहेब भोईर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरातील मुलींच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्ताकडे निवेदना द्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अल्पवयीन मुली आणि एकूणच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे.सुसंस्कृत समाजात अशा गोष्टी पडणं ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे तात्काळ महापालिकेच्या शाळांबरोबरच खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये यामध्ये सुरक्षिततेसंदर्भात खालील उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी करत आहे. यावर तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.
सर्व शाळा महाविद्यालय यामध्ये शिक्षक, पालक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस यांची समिती स्थापन करावी,शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘गुड टच, बेंड टच याविषयी प्रशिक्षण देण्यात यावे. शाळांमध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्यात यावी. पुरुष शिक्षक कर्मचाऱ्यांचे पोलीस व्होफिकेशन करण्यात यावे. दिवसातून दोन वेळा शाळा आणि महाविद्यालय आवारात पोलिसांचा राऊंड असावा.
मुलींना त्रास देण्याच्या घटनांची माहिती कळवण्यासाठी शाळेत अलार्म सिस्टीमसह वेगळा टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
बाल लैंगिक अत्याचार, महिला अत्याचार संदर्भातील कायद्याबाबत जनजागृती करावी असेही निवेदनात म्हटले आहे.