सोसायटीधारकांच्या न्यायहक्कांसाठी प्रशासनाचा ‘संवाद’ चिखली, मोशी, चऱ्होली पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनचा पुढाकार
आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची उपस्थिती
पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदार संघातील सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्याकरिता तसेच शहराच्या विकासासाठी सूचना व संकल्पना मांडण्यासाठी ‘संवाद सोसायटीधारकांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिखली, मोशी, चऱ्होली पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने रविवारी (दि.२५ ऑगस्ट) लक्ष्मी चौक, चिखली येथील सिझन बॅन्क्वेट हॉल येथे सकाळी १० वाजता ‘संवाद सोसायटीधारकांचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सोसायटीधारकांशी विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत अशी माहिती फेडरेशनच्या वतीने प्रसिद्धी देण्यात आली आहे.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सभासद आणि प्रतिनिधींनी आपल्या तक्रारी, सूचना सोसायटीच्या अधिकृत लेटरहेडवर ऑगस्टपर्यंत cmpcsocietyfederation@gmail.com या ई-मेलवर आणि ८९५६२१६३९० या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवाव्यात असे आवाहन सोसायटी फेडरेशनकडून करण्यात आले आहे.
महापालिका व पोलीस प्रशासनाशी निगडी, तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, भोसरी या भागातील सोसायटीधारकांसाठी ‘संवाद सोसायटीधारकांचा’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या परिसरातील रस्ते, पाणी, कचरा, नागरी आरोग्य, आरक्षणांचा विकास याबाबतच्या समस्या आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न जसे की, वाहतूक कोंडी, अवैध व्यवसाय, नागरी सुरक्षा अशा तक्रारी व सूचना मांडण्यासाठी सोसायटीधारकांनी सहभागी व्हावे.
———————————————————