पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित *शिवदर्शन* *श्री संगमेश्वर,सासवड लेखन – माधुरी विधाटे
पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित
🕉️ *शिवदर्शन* 🕉️
त्रिपुरारी पौर्णिमेला संगमेश्वर हे दिव्य शिवालय दोन उत्तुंग दीपमाळांवर आणि घाट पायर्यांवर लावलेल्या दीपांच्या प्रकाशात उजळून निघते . जळातील हे देखणे प्रतिबिंब पाहायला आकाशातील पूर्ण चंद्र सुद्धा क्षणभर थबकतो .प्रत्यक्ष पांडवांनी ज्याची निर्मिती केली, पेशव्यांच्या या पहिल्या राजधानीचे वैभव अनुभवले, आचार्य अत्रे यांचे बाळरूप ज्याने अंगाखांद्यावर खेळवले, श्री संत सोपानदेवांचे निकट सान्निध्य ज्याला लाभले आहे तेच हे संगमेश्वर मंदिर .पुणे जिल्ह्यातील सासवड नगरीत हे शिवमंदिर बाराव्या शतकातील शिल्प वैभवाचा प्राचीन वारसा दिमाखात मिरवत आहे .
कऱ्हा आणि चांबळी नदीच्या पवित्र संगमावर वसले आहे म्हणून संगमेश्वर म्हणतात.प्रशस्त घाट पायर्या चढून गेल्यावर मंदिराच्या प्राकारात दोन सुंदर दीपमाळा दिसतात. नंदीमंडपात पाठीवर दोन नागफण्या कोरलेला अलंकारविभूषित नंदी आहे.कमलपुष्पांनी व सुंदर कलाकुसरीने शोभिवंत स्तंभांवर सभामंडप उभा आहे. गणेश व हनुमानाचे दर्शन घडते .कासव प्रतिमेवर कोरलेले फूल लक्ष वेधून घेते. मंडपाला दोन प्रवेशद्वारे असून स्तंभावर जयविजय हे क्षेत्रपाल आहेत. गर्भागाराच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टिका आणि चौकटीवर पानाफुलांची वेलबुट्टी आहे. गाभाऱ्यात सोपानदेवांचे चित्र, गणेश आणि पार्वती मातेची मूर्ती आहे .काळ्या पाषाणातील सुंदर आणि भव्य शिवलिंगावर रुद्राभिषेक चालू असतो, ओंकाराची स्पंदने घुमत असतात, तेव्हा मनातील भावभावनांचा कोलाहल विरून जातो. आणि एका प्रगाढ शांतीची अनुभूती मिळते. मंदिराच्या कळसावरील गोपूरांमधील देवदेवता,नाजूक नक्षीकाम, चक्रे आणि घाटदार कोरीवकाम पाहून मन थक्क होते. दक्षिणघाटावर खडकेश्वर मंदिर आणि सतींची समाधी मंदिरे आहेत. तसेच दोन शिवालये आहेत. तुळशी वृंदावनात वर तुळस, मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया असून तुळशीला घातलेले पाणी मधल्या शिवलिंगावर पडते.अशा मंगलमय शिवदर्शनाने मनाचा गाभारा प्रसन्नतेने भरून जातो .