ताज्या घडामोडीपिंपरी

दिसली मोकळी जागा की मार ताबा” टोळीमुळे इंद्रायणीनगरचे रहिवासी दहशतीखाली

Spread the love

इंद्रायणी नगर येथील बैठकीत अजित गव्हाणे यांच्याकडे नागरिकांनी मांडल्या व्यथा

शांत, सुनियोजित इंद्रायणीनगरसाठी नागरिक म्हणाले, आता परिवर्तनाची गरज!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज, आणि ‘वेल प्लांड’ नियोजनानुसार स्थापित झालेल्या इंद्रायणीनगरमध्ये आम्ही शांतता, सुनियोजित भाग, चांगल्या सुविधांमुळे घरे बांधली, फ्लॅट घेतले. मात्र आज आम्ही प्रचंड दहशतीखाली आहोत. आमच्या सोसायटीच्या, घराबाहेरच्या मोकळ्या जागा मनमानी पद्धतीने बळकवल्या जात आहेत. फुटपाथवरच्या टपऱ्या, पथारी व्यावसायिकांसाठी गेल्या दहा वर्षात हॉकर्स झोनचे नियोजन न केल्यामुळे इंद्रायणीनगरला अक्षरशः बकालपणा आणला आहे. चौक गुदमरतोय, गुन्हेगारी वाढतेय, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याची कैफियत रविवारी (दि.१८) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासमोर नागरिकांनी मांडली.

इंद्रायणीनगर स्पाईन रोड लगतच्या पर्ल बँक्वेट हॉलमध्ये रविवारी(दि.१८) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, माणिक जैद, पांडुरंग सांडभोर, इम्रान शेख, संजय उदावंत, निवृत्ती शिंदे, सुदाम शिंदे, विजयकुमार पिरंगुटे,पांडुरंग सांडभोर ,श्रीकृष्ण म्हेत्रे, अशोक मोरे तसेच इंद्रायणी नगर भागातील ज्येष्ठ नागरिक,युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी बैठकीमध्ये अजित गव्हाणे यांच्याकडे इंद्रायणीनगर मधील अनेक समस्यांकडे लक्ष वेधले. इंद्रायणीनगरमध्ये बकालपणा वाढत आहे. टपऱ्यांचे साम्राज्य वाढले असून, संतनगर, स्पाईन सिटी, सारा स्वीट, इंद्रायणी स्वीट, राकेश स्वीट यांसारख्या चौकांना तर अतिक्रमणांनी अक्षरश: वेढले आहे. गेल्या दहा वर्षात इंद्रायणीनगर भागात छोट्या व्यवसायिकांसाठी जाणीवपूर्वक हॉकर्स झोनचे कोणतेही नियोजन केले नाही. यातून जोरदार हप्तेवसूली, गुन्हेगारीचे उदात्तीकरन होत असून, छोटे व्यावसायिक अतिशय त्रस्त आहेत. महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा यातून ऐरणीवर आला आहे. चौकांचा श्वास गुदमरत आहे. यातून अशांतता वाढली असून नागरिक हैराण आहेत. येथील प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा ताब्यात घेऊन त्यावर शेड मारले जातात. त्यातून बिनबोभाट भाडे वसुली सुरू आहे. हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? आमच्या सोसायटीच्या, घराबाहेरच्या मोकळ्या जागा कधी गिळंकृत केल्या जातील, त्यावर ताबा मारला जाईल अशी आम्हाला भीती वाटते असे देखील बैठकीत सांगण्यात आले. ही परिस्थिती आम्हाला बदलायची आहे. दहा वर्षांपूर्वी सारखे इंद्रायणीनगर आम्हाला हवे आहे. त्यामुळे आम्हाला आता परिवर्तनाची गरज आहे असे देखील नागरिक म्हणाले.
नागरिक काय म्हणाले?
नागरिकांनी या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे मांडले. इंद्रायणीनगर मध्ये राहण्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असलेली शांतता, मोठे रस्ते, चांगल्या सुविधा हे होते. मात्र आता हेही शांतता लोप पावली आहे. फुटपाथ वरून चालता येत नाही अशी परिस्थिती आहे. इंद्रायणी नगरच्या मुख्य चौकातील फूटपाथ अक्षरशः गिळंकृत करण्यात आले आहेत. यावर हातगाडी, टपऱ्या, पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. टपरी, पथारी व्यवसायिकांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन उपलब्ध करून द्यावे. यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांनी अजित गव्हाणे यांच्याकडे केली.

इंद्रायणीनगर येथील ओमनगरी शेजारच्या मोकळ्या जागेमध्ये दत्त मंदिर असताना भोसरी मतदार संघातील आमदारांच्या बगलबच्चांनी धाकधपटशाचा अवलंब करत येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरू केले. येथील नागरिकांची संमती घेतली नाही. ओम नगरीतील नागरिकांनी एकी दाखवली आणि उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर पाण्याच्या टाकीचे काम सध्या तरी बंद आहे. पाण्याच्या टाकीला विरोध नाही मात्र दुसरीकडे पाण्याची टाकी होत असतानाही जाणीवपूर्वक राजकारण केले गेले. ही मोकळी जागा मुलांना खेळण्यासाठी, जेष्ठ नागरिकांच्या विविध कार्यक्रमांसाठी असताना पाण्याची टाकी बांधण्याचा उद्योग कोणाच्या आशीर्वादाने केला? टाकीच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला. आता तिथे पावसाचे पाणी साचले आहे. गवत वाढले. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांना डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या टाकीचे आरक्षण नसताना जाणीवपूर्वक हा खटाटोप केवळ राजकारणासाठी करण्यात आला. याचा नाहक त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे असे देखील नागरिकांनी यावेळी सांगितले.
भोसरी मतदार संघात गेल्या दहा वर्षात दुपटीने वाढलेली अतिक्रमणे आणि पथारीवाले अशा असंख्य प्रश्नांची जंत्री आहे. याच प्रश्नाचे भांडवल करून येथील आमदारांनी स्वतःचे खिसे भरले. दहा वर्षापासून छोट्या व्यवसायिकांना हॉकर्सची प्रतीक्षा आहे. हे प्रश्न सुटणार म्हणून भोळ्याभोबड्या जनतेने डोळे झाकून या मतदारसंघात सलग दहा वर्ष भाजपला सत्ता दिली. मात्र येथील आमदारांनी भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार या पलिकडे येथे एकही उलेल्खनीय काम केलेले नाही. आता नागरिक याबद्दल उघडपणे बोलू लागले आहेत.
– अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती पिंपरी चिंचवड महापालिका.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button