स्वातंत्र्याचे सुराज्य व्हावे ही माफक अपेक्षा खरचं पूर्ण झाली का? – सुरेश कंक
*स्वातंत्र्य*
७८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या बंधनातून मुक्त होऊन भारत देश स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी.
हजारो क्रांतिकारक देशभक्त , ज्ञात अज्ञात अशा सर्वांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, फासावर हसत हसत गेले.
स्वातंत्र्याचे सुराज्य व्हावे ही माफक अपेक्षा खरचं पूर्ण झाली का?
स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी आजची माणसे 26 जानेवारी 15 ऑगस्ट, एक मे कामगार दिन याकडे फक्त त्या दिवशी मिळणारी सार्वजनिक सुट्टी म्हणून तर पहात नाहीत ना?
असंख्य प्रश्न आज सर्व क्षेत्रात आ वासून उभे आहेत. भूक, बेकारी दारिद्र्य, उपासमार, शिक्षण, धर्मा धर्मातील जाती जातीतील भेद, वाढती लोकसंख्या, पाणी, वीज , शिक्षण, घरे, शेती उत्पादन इति साऱ्या प्रश्नांना गेल्या 78 वर्षात आपण फक्त ठिगळ लावण्याचे काम करत आहोत. लोकसंख्या नियंत्रित नाही आपल्या देशाची.
घाम गाळणारा फक्त घाम गाळतो. अन् भांडवलदार कोटीने नफा कमावतो त्यामुळे श्रमिक कामगारांचे प्रश्न… आरोग्याचे प्रश्न, वाढता भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी हे सारेच प्रश्न मला आज आपल्या तिरंग्याकडे पाहून अस्वस्थ करतात.. दोन तीन गोष्टींचा उल्लेख करतो.
१) टेलिव्हिजन वरील वाहिन्या ज्या बातम्या देतात त्यामुळे लोकमानसांवर प्रचंड परिणाम होत असतो.
हल्ली टेलिव्हिजन ओपन केला की, राजकीय पुढाऱ्यांची आतषबाजी, वाटेल ते बोलणे आणि राजकारणी पुढारी यांचेच चेहरे पाहून असं वाटते की, ही माध्यमे राजकारणाच्या आहारी गेलीत की काय? घराघरातील आठ वर्षांपासून ते युवा मुला मुली पर्यंतच्या या नवपिढीने यातून काय शिकायचे?
परदेशात या माध्यमांचा खूप चांगला उपयोग करून घेतला जातो. आपल्याकडे तसा होताना दिसत नाही.
*काहीही दाखवतात टेलिव्हिजनवर..*
उदाहरण.. झी टीव्हीवर सध्या एक मालिका आहे. लाखात एक आमचा दादा. यात एक प्रसंग दाखवला आहे की, एका डॉक्टर मुलीच्या भविष्यात तिचे लग्न झाले तर तिचा पती मरण पावेल म्हणून त्या डॉक्टर मुलीचे लग्न एका रेड्याबरोबर लावून देण्याचा प्रसंग आज 15 ऑगस्ट च्या दिवशी आपणा सर्वांना दिसणार आहे.
अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा कथा सेंसार कशा होतात? हिटलर नावाच्या एका मालिकेत दोन तरुणींना जाळण्यासाठी सर्व बाजूंनी रॉकेल ओतण्याचा प्रसंग.. पारू या मालिकेत एक स्री दुसऱ्या स्रीची विटंबना करू पहाते
यापूर्वी मालिकांमधून क्रूरता दाखवली जात नव्हती पण आता दाखवली जाते. या मालिकांचे लेखन लेखकच लिहितो ना.. त्यांच्या अशा लेखनाने असंख्य माणसांवर काय परिणाम होईल याचे भान दिसत नाही.
२) *वाहतूक व्यवस्था..*
वाहतूक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला आहे. देश स्वतंत्र झाला म्हणजे आपण कसेही वागायचे का?
सिग्नल न पाळणे हे जणू दुचाकी चालकांचा जन्मसिद्ध हक्क बनला आहे.
मोबाईल हातात घेऊन गाड्या चालवणे, दुचाकीवर ट्रिपल सीट बसणे, वाहतुकीचे नियम मोडणे हे सारे आपल्याला स्वातंत्र्यांने शिकवले आहे का?
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी सांगितलेला एक किस्सा मुद्दाम लिहितो.
ते परदेशात गेले होते. एका कार्यक्रमात त्यांना रात्र झाली. ते कार मध्ये बसले. रस्ता सूनसान होता. चौकात रेड सिग्नल लागला होता. तो ड्रायव्हर थांबला आणि सिग्नल मिळाल्यावर पुढे गेला.. अन् आपल्याकडे…..
३) *स्वच्छता*
आपल्या देशाच्या पंतप्रधानांना सांगावे लागते स्वच्छ भारत सुंदर भारत.. ही बाब मनाला खटकते. स्वच्छता पाळणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता न पाळल्याबद्दल इतर अनेक देशात मोठे दंड आकारण्यात येतात.
आपल्याकडे रस्त्यावर थुंकणे, सहज हातात आलेला कागद फेकणे असे चित्र दिसते. महानगरपालिकांनी कचऱ्याच्या गाड्या शहरांमध्ये गल्लोगल्ली फिरविल्या आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाका असे आवाहन करूनही महिला भगिनी वेगळा करत नाहीत. त्या कचऱ्याच्या घंटा गाडीत उभी राहिलेली दुसरी कामगार महिला असाह्य झालेली मी पाहिली आहे.
लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतो. पण हल्ली आपल्या देशात सर्रास रस्ते अडवण्याची आंदोलने होऊ लागली आहेत.
सार्वजनिक मुताऱ्या गुटख्याने रंगलेल्या.. सार्वजनिक जागेत, रेल्वेच्या पटरी भोवती कचऱ्याचे ढीग दिसतात.
बस अन् रेल्वे वाहतुकीसाठी खूप चांगली व्यवस्था आहे पण तिथेही आपण कचरा करतो, जाहिरात पोस्टर लावतो, आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान करतो..
सार्वजनिक रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने दुकाने थाटतो.. पादचारी मार्गावर अतिक्रमण करतो. यासाठी देशभक्त आणि क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिले होते का?
प्रत्येकाने जबाबदारीने वागणे, हक्क आणि कर्तव्य याची जाणीव होणे हीच खरी देशभक्ती ठरेल.
चुकीचे दिसत असेल त्यावर व्यक्त होणे हे खरे स्वातंत्र्य.
मी लिहिलेल्या गोष्टी खूप छोट्या आहेत. छोट्यातून मोठे काम होते यावर माझा विश्वास आहे.
आता शालेय विद्यार्थ्यांना शाळेतील धड्यात
स स स्वच्छतेचा
क क कामाचा
प प पाणी बचतीचा
हे प्राथमिक शिक्षणात येणे आवश्यक आहे.
सुरेश कंक