यशस्वी संस्थेच्या आयआयएमएसमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स आयआयएमएस मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने याझाकी इंडिया लिमिटेड या कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक निलेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी त्यांच्या प्रास्ताविकपर भाषणात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण कायम ठेवत, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या योगदानाचे कायम स्मरण ठेवावे आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी शक्य तेवढे प्रयत्न प्रत्येकाने करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलेश पाटील यांनीही त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाचे करिअर करताना आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करून कृतीशील व्हावे असे आवाहन केले.
याप्रसंगी यशस्वी संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या साहित्य कलागुणांचा समावेश असलेल्या ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छ भारत,विकसित भारत,पर्यावरण रक्षण इत्यादी संकल्पनांवर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स स्पर्धेतील सहभागी पोस्टर्सचे सादरीकरण करण्यात आले.यावेळी यशस्वी संस्थेचे संचालक मकरंद कुलकर्णी,संचालक संजय छत्रे,संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी,ऑपरेशन विभागाचे प्रमुख राजेंद्र शेळके, नितीन थेटे यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग आणि एमबीए व एमसीएचे विद्यार्थी -विद्यार्थिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पवन शर्मा, प्रा. युगंधरा पाटील, प्रा. महेश महांकाळ आदींनी विशेष सहकार्य केले.