पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकशाहीचा जागर करीत शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून आपल्या प्रेरक इतिहासाचा अभिमान बाळगत, उज्ज्वल भविष्य साकारण्यासाठी वर्तमानातील जबाबदारी स्विकारत मंगलमय भावनेने स्वातंत्र्य दिन साजरा करूया, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा ७७ वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना आयुक्त सिंह बोलत होते.
या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास आमदार उमा खापरे, माजी महापौर अपर्णा डोके, उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसदस्य नामदेव ढाके, गोविंद पानसरे, माजी नगरसदस्या मीनल यादव, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपआयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, संदीप खोत, रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, निलेश भदाणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, पंकज पाटील, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैदयकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, ऋतुजा लोखंडे, शैलजा भावसार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, कर्मचारी महासंघाच्या चारूशीला जोशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महापालिका कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिका कटिबद्ध आहे, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.
नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब दिसावे यासाठी “अंदाजपत्रकात नागरी सहभाग” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून नवीन प्रकल्प, योजना, विविध कामे सुचविण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सर्व घटकातील नागरिकांना सामावून घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात देखील महापालिका काम करीत आहे. तसेच अनेक आव्हानांवर मात करून आज आपण विविध क्षेत्रात विकासाचे मोठे टप्पे गाठले आहेत. शहरवासियांच्या साथीने येत्या काळात देखील देशाच्या जडणघडणीमध्ये आणि सर्वांगीण विकासामध्ये आपल्या शहराचे भरीव योगदान असेल असा विश्वासही आयुक्त सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतीय तिरंगा ध्वजारोहणानंतर महापालिकेचे अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन दल, महाराष्ट्र पोलीस दल महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दल यांच्या वतीने पाथसंचालन करण्यात आले. या पथसंचालनाचे नेतृत्व अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांनी केले.
दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत १९७१ आणि १९९९ च्या युद्धामध्ये देश सेवा बजावणारे माजी सैनिक तसेच देश सेवा बजावताना शहीद झालेल्या जवान यांच्या पत्नी वीरनारी यांचा सन्मान आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये माजी सैनिक एल.आर.ओ.- डी. एच कुलकर्णी, सुभेदार मेजर वाय एस महाडीक, सॅपर बी.ए अब्दागिरी, सार्जंट एम एन भराटे, हेमंत काजळे, अभय कासार, जयंत दोफे, पी.के.भजने,हवालदार एम.के अडसूळ, एम सी संतोष इंगवले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अग्निशमन दलाचे जवान शहीद विशाल हनुमंत जाधव यांच्या पत्नी वीरनारी श्रीम. प्रियांका विशाल जाधव यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
तसेच यावेळी पूरबाधित नागरिकांना अन्नदान करणाऱ्या इस्कॉन संचालित अन्नामृत सामाजिक संस्थेच्या सीतापती दास यांचा तसेच महापालिका सुरक्षा दलाचे जवान भीमराव केंकरे यांचाही सन्मान आयुक्त सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली, यावेळी आयुक्त सिंह यांच्यासह उपस्थित सर्वांनी या फलकावर स्वाक्षरी केली. शहरातील दिव्यांग बांधवांनी काढलेल्या तिरंगा सन्मान रॅलीचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच भारतीय तिरंगा ध्वजाचे सन्मान करण्यासाठी तिरंगा प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली. या तिरंगा प्रतिज्ञेचे वाचन विजया सोळंके यांनी केले तर भारतीय नागरिकांचे महत्वाचे कर्तव्य म्हणून मतदारांनी निवडणुकांमध्ये मताचा अधिकार बजावावा यासाठी उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. या प्रतिज्ञेचे वाचन विकास गायकांबळे यांनी केले. तसेच तंबाखू मुक्तीबाबत शपथ देखील उपस्थितांनी घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच पौर्णिमा भोर यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौक, निगडी येथे सामूहिक राष्ट्रगीतानंतर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मनिषा निश्चल, मनोज सेठिया, अक्षय मोहिते, द्रिष्टी बलानी, सतिश इंगळे, वंडरबॉय पृथ्वीराज इंगळे, प्रिती बिजवे, किरण अंदुरे, दिपक माने यांनी “सारे जहॉ से अच्छा, ऐ मेरे वतन के लोगो, सुनो गौर से दुनिया वालो” यांसारखे अनेक देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन मनीष रुब्दी यांनी केले. तर निवेदन अक्षय मोरे यांनी केले.