समाज विकास विभागामार्फत १० वी आणि १२ वीच्या मुलींना डिप्लोमा कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यासाठीच्या खर्चास स्थायी समितिची मान्यता
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-महापालिकेच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या चिखली येथील टाऊन हॉलचे तसेच आकुर्डी येथील ग. दि माडगुळकर नाट्यगृहाचे भाडे किंवा अनामत दर व इतर भाडे आकारणीसाठीच्या विषयाला तसेच इतर विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज प्रशासकीय मान्यता दिली.
महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक सिंह यांनी विविध विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेक्षागृह आणि नाट्यगृह येथे नाटक तसेच विविध स्वरूपाचे सांस्कृतिक किंवा इतर कार्यक्रम होत असतात. सद्यस्थितीत महापालिकेचे एकूण ५ प्रेक्षागृह, नाट्यगृह सुरू आहेत. या ५ प्रेक्षागृह किंवा नाट्यगृहांचे भाडे किंवा अनामत दर निश्चित करण्यात आले आहेत. परंतु आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि माडगुळकर नाट्यगृह तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या चिखली येथील टाऊन हॉलचे भाडे किंवा अनामत दर निश्चित करणे आवश्यक होते. त्यामुळे नटसम्राट निळु फुले रंगमंदिर, पिंपळेगुरव येथील मंजूर असलेले भाडे किंवा अनामत दरांप्रमाणे ग. दि. माडगुळकर नाट्यगृहाचे दर निश्चित करण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या चिखली येथील टाऊन हॉलचे नव्याने निश्चित केलेले दर लागू करण्यासाठीही प्रशासक सिंह यांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली.
याव्यतिरिक्त, समाज विकास विभागामार्फत १० वी आणि १२ वीच्या मुलींना डिप्लोमा कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यासाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे वाकड येथील फिनिक्स मॉलकडे जाणारा मंजुर विकास योजनेतील २४.०० मीटर रुंद रस्त्याखालील जमीन संपादन करण्यासाठी, महापालिकेच्या प्रभाग क्र. ८ मधील परिसरामध्ये सेक्टर ४,५ व इतर ठिकाणी स्थापत्य विषयक सुधारणा विषयक कामे करण्यासाठी, रावेत येथील जलउपसा केंद्र येथे टप्पा १ व २ अंतर्गत ५० दशलक्ष लिटर क्षमतेचे पंपाचे मोटर फिडर बदलण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये मोठ्या मृत जनावरांकरिता नवीन इन्सीनरेटर बसविण्यासाठी एम.एन.जी.एल कडून गॅस कनेक्शन घेण्यासाठी येणाऱ्या खर्चासह इतर विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली.