ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरीत राष्ट्रमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शहराध्यक्ष ओबीसी सेल विशाल जाधव यांच्यावतीने अभिवादन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीत राष्ट्रमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शहराध्यक्ष ओबीसी सेल विशाल जाधव यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर चंद्रजी पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी अभिवादन करताना  ते म्हणाले, भारतात 18 व्या शतकात एक शूर, कर्तबगार,हिम्मतवान तेजस्वी महिला माळवा प्रांतात महाराणी होऊन गेल्या. त्यांनी अनेक आपदांवर मात करीत मोठ्या हिंमतीने व बाणेदारपणे लोक कल्याणकारी राज्य कारभार केला. त्यांची तुलना जगातील राज्यकर्त्या महिलांसोबत करताना एक इंग्रज लेखक म्हणतो की “महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्यामध्ये रशियाची राणी कॅथरिन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ व डेन्मार्कची राणी मार्गारेट या तिन्ही राण्यांचे गुण एकत्रितपणे सामावले आहेत.”

लोकमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म दिनांक 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी तालुका जामखेड येथे धनगर समाजातील शिंदे कुटुंबात झाला. माळवा प्रांताचे जहागीरदार मल्हारराव होळकर एकदा पुण्यास जातांना चोंडी येथे थांबले असता एका मंदिरातील केवळ आठ वर्षीय मुलीच्या सुस्वरातील आरतीने व तिच्या बाणेदार, चुणचुणीत उत्तरांनी त्यांना आकर्षित केले. बालपणीच्या त्या अहिल्यादेवींना त्यांनी आपल्या खंडेराव नांवाच्या मुलासाठी त्यावेळच्या बालविवाह प्रथेनुसार विवाह करून सून म्हणून आणले. अहिल्यादेवी च्या
धैर्य, पराक्रम,हिंमत सेवाभावीपणा व तन्मयता या गुणांनी सासरलाही प्रभावीत केले.

त्यांचे पती खंडेराव होळकर यांचे कुंढेलच्या युद्धात तोफगोळ्याच्या माराने निधन झाले. अहिल्यादेवीतील शौर्य तेज व बाणेदारपणा पाहून मल्हारराव होळकर यांनी त्यांना खंडेरावांच्या मृत्यूनंतर सती जाण्यापासून परावृत्त केले. समाजातील टीका व अवहेलना यांना न जुमानता राणीअहिल्या देवींनी सती न जाण्याचे ठरविले.व त्यांच्या मुलास राज्यकारभार पाहण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका घेतली. परंतु बारा वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर आघात झाला. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधन झाले.त्यामुळे त्यांचा एकमेव असलेला आधारही गेला. केवळ एक वर्षाचे आत पुत्र मालोजीराव यांचेही निधन झाले. दुःखांनी त्यांची पाठ सोडली नाही. परंतु न डगमगता अशा कठीण समयी अत्यंत धैर्याने व सैन्याच्या पाठिंब्याने त्यांनी राज्यकारभार हाती घेण्याची ठरविले. याची कुणकुण पेशव्यांना लागताच एका महिलेने प्रमुख म्हणून राज्य कारभार चालवावा हे काही त्यांना रुचले नाही. त्यामुळे महाराणींना अपदस्थ करण्यासाठी सैनिकी चढाईची तयारी सुरू केली. हे महाराणी अहिल्यादेवीस कळताच त्यांनी पेशव्यांकडे महाराणी पदाच्या मंजूरातीसाठी एक खलिता पाठविला. त्यामध्ये त्यांनी परखडपणे पेशव्यांना लिहिले की “तुम्ही मला एक अबला समजून विरोध करू नये. वेळ पडली तर मी सुद्धा रणांगणावर लढू शकते. त्यासाठी शूर महिलांची एक मोठी पलटण मी उभी केली आहे. तुम्हाला माझा पराभव करण्यासाठी प्रथम त्यांच्याशी लढावे लागेल. युद्धात आम्ही हरलो तर काही विशेष होणार नाही, परंतु तुमचा ह्या महिलांच्या पलटणीने पराभव केला तर तुमची मोठी नाचक्की होईल.व तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हा विचार करूनच आपण लढाईचा निर्णय घ्यावा”

ह्या पत्रामुळे साहजिकच पेशव्यांनीचढाईचा विचार दूर सारला. आणि लोकमाता अहिल्यादेवी माळवा प्रांताच्या महाराणी बनल्या. खलीत्यातून महाराणी अहिल्यादेवींच्या आत्मविश्वास व पराक्रम दिसून येतो. एक कठोर प्रशासक मुत्सद्दी राजकारणी तसेच निष्पक्ष न्यायदानासाठी त्यांची प्रसिद्धी होती. एकदा तर राज्य करीत असतांना त्यांच्या मुलाकडूनच अपराध घडला.रस्त्याने एका गाईच्या वासरा वरून गेला. महाराणी आपल्या मुलाला न्यायसना समोर उभे केले.व सामान्य नागरिकाप्रमाणे त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा सुनावली. त्याचे हातपाय बांधून रस्त्यावर टाकावे व त्याच्याच प्रमाणे रथ हाकावा.
तो रथ त्या घटनेच्या ठिकाणीच आला असता एक गायीने मध्ये रस्ताअडविला व पुढील अनर्थ टळला होता.

कठोर प्रशासक व मुत्सद्दी राजकारणी युद्ध समयी त्या स्वतः हाती तलवार घेऊन घोड्यावर किंवा हत्तीवर आरुढ होऊन रणांगणावर लढत असत. त्यांनी राज्यकारभार हाती घेताना त्यांच्या कुटुंबातीलच तुकोजीराव होळकर यांचा काहीसा विरोध झाला होता. ते लक्षात घेऊन सर्वप्रथम त्यांनी तुकोजीराव होळकर यांना भावनिक आव्हान करत सैन्याचे सेनापती बनविले. त्यामुळे सेनापती तुकोजीराव आपलेसे झाले व त्यांचा विरोध मावळला.
राज्याच्या जंगलांतील भिल्ल व गोंड जमातीतील चोर दरोडेखोरांना लोक भीत असत. हे पाहून महाराणींनी भिल्ल, गोंड जमातीतील गुन्हेगारांनाच जंगलांचे संरक्षक बनविले व त्यांना जमिनी देऊन शेतीकामाचा पर्याय उपलब्ध करून दिला. हळूहळू त्यांच्यामध्ये परिवर्तन होत ते चांगले नागरिक झाले. व प्रजा निर्भय झाली.

त्यांनी राज्यकारभारासाठी इंदोर जवळ नदी तीरावर महेश्वर येथे राजधानी उभारली. आणि राजधानीत विद्वान व कलाकारांना आश्रय दिला. परिश्रमी लोकांसाठी उद्योगधंदे सुरू केले. कुशल वस्त्र कारागीरांसाठी गिरणी सुरू केली.
प्रजेमध्ये कोणासही आवश्यकतेनुसार दत्तक घेता यावे, यासाठी दत्त विधान प्रक्रिया सुलभ केली. एकदा त्यांच्या एका अधिकाऱ्याने लाच घेण्याचे उद्देशाने दत्तविधानास मंजुरी नाकारली होती.हे कळताच महाराणी अहिल्यादेवींनी स्वत: त्या कुटुंबा करिता दत्तविधानाचे आयोजन केले. तसेच दत्तकास वस्त्र व दागिने भेट दिले.
राज्यातील इंदोर व इतर नगरांचा उत्तम विकास केला.प्रजेसाठी सोयी- सवलती केल्या.

राज्यात अनेक मार्ग व महामार्ग तयार केले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वृक्ष वाढविले. वाटसरूं साठी जागोजागी पिण्याच्या पाण्याच्या पाणपोया सुरू केल्या. बेघरांना घरे दिलीत. प्रजेच्या गरजांनुसार सोयी केल्यात.शेतकऱ्यांसाठी अनेक तलाव व विहिरी बांधल्यात. नागरिकांना गायी वाटून गोपालन आश्रम उभारले.अशा प्रकारे त्या प्रजेची सर्व प्रकारे काळजी घेत असत.

मानवता केवळ माणसांसाठीच नव्हे तर पशुपक्ष्यांसाठी पाणवठे व घरटी रस्त्या-रस्त्यांवर उभारली. मुंग्यांसाठी साखर व पक्षांसाठी खाद्य ठेवले. असा लोक कल्याणकारी राज्यकारभार केला.
*सामाजिक कार्य*- समाजातील कोणत्याही रूढी परंपरेचे अंधत्वाने पालन करत नसत. म्हणूनच तत्कालीन सती प्रथेचा अवलंब अत्यंत खंबीरपणे नाकारला. अस्पृश्यता व हुंडा पद्धतीचा त्यांनी विरोध केला. राज्यात सर्व धर्म समभाव जोपासला. महिलां मधील पडदा पद्धती दूर सारली.
*धार्मिक कार्य*–त्या स्वतः शिवभक्त होत्या. त्यांनी भारतभर पुष्कळ ठिकाणी धर्मशाळा,व भव्य मंदिरे उभारलीत. काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अन्नछत्रे चालवली. संस्कृत पाठशाळा सुरू केल्या. अनेक नदी तीरांवर, धार्मिक स्थळी घाट बांधलेत. व ते बांधताना महिलांच्या बारीक सारीक सोयी करण्यासाठी त्यांनी खुद्द महिलांशी चर्चा केली.

त्यांनी उभारलेल्या शेकडो मंदिरांमध्ये मोहम्मद गजनीने लुटलेले सोरटी सोमनाथाचे मंदिर आहे.तेथे एक नवीन शिवमंदीर ही बांधले. तसेच काशी, गया, बद्रीनाथ, केदारनाथ, मथुरा, अयोध्या, हरिद्वार रामेश्वर, जगन्नाथ पुरी, अवंती, कांची येथील मंदिरांचाही समावेश आहे.
एका धनगर समाजातील महिलेने अफाट आत्मविश्वास, पराक्रम, शौर्य,मुसद्देगिरी, हिंमत प्रजेबद्दलचा कळवळा, विकासाची उर्मी दाखवत उत्कृष्ट लोकोपयोगी राज्यकारभार केला. त्यांच्या न्यायदानातील परखडपणा व तटस्थता
आजही आदर्श अशी वाटते.
त्यांचे एकूणच कार्य अत्यंत प्रेरणादायी विशेषतः महिलांसाठी आज आत्मविश्वास वाढविणारे आहे. त्या कार्यामुळेच त्यांना *लोकमाता* असे संबोधले जाते.

त्यांच्या अतुलनीय कार्या बद्दलचा आदर म्हणून इंदोर येथील नागरिकांनी समाजात उत्कृष्ट सेवा कार्यासाठी *लोकमाता अहिल्यादेवी स्मृती पुरस्कार* सुरू केला आहे. इंदोरच्या विश्वविद्यालयास व विमानतळास *पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकरांचे* नांव देण्यात आले आहे. तसेच सोलापूर येथील विद्यापीठासही लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने सुद्धा अहमदनगर शहराचे नाव *अहिल्यानगर* करण्याचा निर्णयक कृतज्ञपणे घेतला आहे.
अशा ह्या झुंजार महिला राज्यकर्तीचे 13 ऑगस्ट 1795 रोजी निधन झाले. त्यांचे स्मरण करून आपण प्रेरणा घेतली पाहिजे.

विशेष असे की, बालपणी अहिल्यादेवींनी काही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांचा लेखन व वाचनाचा अभ्यास वडील माणकोजी शिंदे यांनी करून घेतला होता. आणि विवाहा नंतर राज्यकारभारासाठी आवश्यक असे सैनिकी व प्रशासकीय शिक्षण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनात घेतले होते. त्यापासून प्रेरणा घेत आज उपलब्ध असलेल्या शिक्षण, प्रशिक्षणांच्या सोयींचा लाभ घेत युवकांनी विशेषतः युवतींनी स्वतःला आत्मविश्वासाने उन्नत केले पाहिजे .व नेतृत्वाची क्षमता सुद्धा संपादन केली पाहिजे.
लोकमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करीत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार शहराचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला उपाध्यक्ष रेखा मोरे, पिंपरी विधानसभा महिला उपाध्यक्ष कल्पना गाडगे, राजश्री कारंडे, ज्योती येवले, ओबीसी शहराध्यक्ष भाई विशाल जाधव, सरचिटणीस सचिन दादा गायकवाड, विवेक विधाते, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष अजय पिल्ले, ओबीसी उपाध्यक्ष बिरुदेव मोटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button