पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित *शिवदर्शन* विरुपाक्ष शिवमंदिर,हंपी *लेखन- माधुरी शिवाजी विधाटे
*पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित*
🕉️ *शिवदर्शन* 🕉️
*लेखन- सौ. माधुरी शिवाजी विधाटे, पुणे*
*विरुपाक्ष शिवमंदिर,हंपी*
*१२ ऑगस्ट २०२४*
*द्वितीय श्रावणी सोमवार*
हंपी मधील आल्हाददायक संध्याकाळ. सूर्यकिरणे नुकतीच कलायला लागली होती. अशावेळी प्रचंड आकाराच्या शिळांनी वेढलेल्या परिसरामध्ये भव्य, उंच व नक्षीदार गोपुर दृष्टीला पडले. हे हंपी मधील सर्वात प्राचीन शिवमंदिर असून विरूप अक्ष असलेले शिवमंदिर म्हणून विरूपाक्ष मंदिर या नावाने ओळखले जाते .हे शिवमंदिर विजयनगर साम्राज्याच्या उदय व अस्ताचे साक्षीदार आहे .रामायण काळातील या पवित्र किष्किंधा क्षेत्रामध्ये विरुपाक्ष महादेवांना पंपापती या नावाने म्हणजेच पार्वती देवींचे पती या नावाने संबोधले जाते. हेमकूट पर्वतपायथ्याशी हे द्रविडीयन स्थापत्य कलेतील सुंदर मंदिर मोठ्या डौलाने उभे आहे .
या मंदिराला दोन प्रांगण व दोन गोपुरे आहेत. पहिल्या दहा मजली उंच गोपुरावर
विष्णू ,श्रीदेवी, भूदेवी, कृष्ण,रुक्मिणी, सत्यभामा, वेणुगोपाल ,राम-सीता-लक्ष्मण आणि गणेश यांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. या महाद्वारातून देवालयाच्या विस्तृत प्रांगणात प्रवेश केला. यात दगडाच्या पन्हाळी मधून तुंगभद्रेचे पाणी खेळवून वरून ते दगडांनी बंदिस्त केलेले आहे .त्यामुळे आल्हाददायक शीतलता अनुभवास आली.मंदिरात शिवसूक्तांचे मंगल सूर कानावर पडत होते.इथे पारंपारिक वाद्यांच्या साथीने त्रिकाळ विधीवत शिवपूजन होते. तुंगभद्रेच्या दक्षिण तीरावर वसलेल्या या क्षेत्राची दक्षिणकाशी अशी महती आहे. येथे एक देह आणि तीन मुखे असलेल्या नंदीचे दर्शन घेतले. देवालयाच्या गर्भगृहात स्वयंभू स्वरूपातील श्री विरुपाक्षेश्वराचे दर्शन घेऊन अतिशय प्रसन्न वाटले.मंदिराच्या उत्तरेला भुवनेश्वरी देवीचे दर्शन घडले.
पहिल्या प्रांगणाच्या पश्चिमेला राजा कृष्णदेवरायाच्या पट्टाभिषेकाच्या स्मरणार्थ निर्माण केलेले सुंदर गोपुर दिसले.तसेच सभामंडप ,विवाह मंडप, कल्याण मंडप, ध्यान मंडप असे विविध भाग दिसले.यातील सभामंडप कोरीव कामाने नटलेल्या भव्य दगडी स्तंभांवर तोललेला आहे. राम ,कृष्ण ,शिव या देवतांचे सुंदर शिल्पचित्रण येथे पाहायला मिळते.दक्षिणेकडील स्तंभ मंडपात गणेशाची विशाल मूर्ती आहे . राज्याभिषेक मंडपातील छतावर शिवपार्वती ,विष्णू, नरसिंह अवतार, अष्टदिक्पाल, पंचमहाभूते अशी सुंदर भित्तीचित्रे बघून त्याकाळातील चित्रकारांविषयी आदरभावना मनात दाटून आली.या परिसरात मुक्ती नरसिंह स्वामी ,सूर्यनारायण देवस्थान, तारकेश्वर देवस्थान, बलीपीठ, नंदीपीठ, ध्वजस्तंभाचे दर्शन घडले. येथील इष्टाब्दीसिद्धी लिंगाचे विधीवत पूजन केल्यावर सर्व संकल्प सिद्धीला जातात अशी मान्यता आहे. कल्याण मंडपात विजयनगर साम्राज्याच्या कलात्मक राजमुद्रेचे दर्शन घडले. एका कक्षात पूर्व दिशेला एक रंध्र दिसले.या रंध्रातून सूर्यकिरण पश्चिमेकडील भिंतीवर पडून समोरच्या मोठ्या गोपूराचे उलटे प्रतिबिंब दिसते असे मार्गदर्शकाने सांगितले.एवढ्या प्राचीन स्थापत्य कलेत पिन होल कॅमेरा अस्तित्वात होता हे कळल्यावर आश्चर्य वाटले.
दगडी पायऱ्या उतरून गेल्यानंतर भूमीगत शिवमंदिरातील पाण्याने वेढलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे पावन दर्शन घडले.
कनकगिरी गोपूरात रत्नगर्भ गणपती व देवीचे दर्शन घेतले. तिथून उजव्या बाजूला दगडी पायर्यांची सुंदर रचना असलेले मन्मथ सरोवर दिसले. यामध्ये गोपूराचे आणि नीलगगनाचे अतिशय सुंदर प्रतिबिंब पडलेले पाहून मनाच्या जलाशयात देखील आनंदलहरी उचंबळू लागल्या. सालंकृत गजराजाने सोंड उंचावून दिलेला मंगलमय आशीर्वाद घेऊन मन तृप्त झाले. रामायण काळातील या किष्किंधा क्षेत्रात भक्तांनी दिलेली केळी खाणाऱ्या वानराच्या रुपात जणू काही मारुतीरायाचे दर्शन घडले. मावळत्या दिनकराच्या साक्षीने तिथून निघालो, तेव्हा मंदिर परिसरात सोनेरी किरणोत्सव रंगला होता.
*लेखन -सौ.माधुरी शिवाजी विधाटे*
*पिंपरी चिंचवड साहित्य मंच*
*नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळ