पुण्याच्या गणेशोत्सवात लोकसहभाग वाढविणे गरजेचे – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२३ च्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा
पुणे ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशभरात पुण्याच्या गणेशोत्सवाचे महत्व आहे. गणेशोत्सव हा समाजाचा उत्सव आहे. त्यामुळे त्यामध्ये लोकसहभाग कशा पद्धतीने वाढेल, हे आपण पाहिले पाहिजे. आजमितीस उत्सवातील लोकसहभाग कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे उत्सवाला धार्मिक, मंगलमय आणि समाजहिताचे रुप देण्याचा प्रयत्न करुया, असे आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२३ पुणे शहर महापालिका क्षेत्र परितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, अॅड. प्रताप परदेशी, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, अण्णा माळवदकर, अजय खेडेकर यांसह ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे शहर विभागात कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुस-या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने चौथे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली.
अमितेश कुमार म्हणाले, पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी शिस्तीने व उत्साहात पार पाडू. गणेशोत्सव मंडळांची लवकरच बैठक घेऊ आणि आपल्या अपेक्षा समजून घेऊन कार्यवाही देखील करू, असे आश्वासन त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले, सण उत्सवात पोलीस आपल्यासोबत आहे. तसेच आपल्याला सहकार्य देखील करणार आहोत. पुणे शहरात गणेशोत्सवाचा बंदोबस्त आम्ही पोलीस म्हणून करीत आहोत, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्ताविकात हेमंत रासने म्हणाले, गेली ४० वर्षे पुणे शहर विभागात स्पर्धा सुरु आहे. उत्सवात विधायकता वाढावी, याकरिता स्पर्धा सुरु झाली. यातून विधायक शक्ती निर्माण झाली आणि जगाच्या नकाशावर पुण्याचा गणेशोत्सव मंडळानी नेला आहे, असेही त्यांनी सांगितले. परीक्षक मंडळातील परीक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.