‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत त्रिवेणीनगरमधील मुख्य चौकातले अतिक्रमण हटविले
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आज त्रिवेणीनगर मुख्य चौकात असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. त्रिवेणीनगर येथील स्पाइनरोडची सुटलेली लिंक पूर्ण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
त्रिवेणीनगर मुख्य चौकातील अनधिकृत बांधकामांमुळे स्पाईन रोड, तळवडे, भक्ती शक्ती चौकाकडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते, त्यामुळे स्पाईनरोडच्या सलग जोडणीमध्ये बाधा निर्माण होणाऱ्या सुमारे २० हजार स्क्वेअर फुट क्षेत्रातील ८ बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये मुख्य चौकातील ३ मजली इमारतीचाही समावेश होता. याठिकाणी रस्ता रुंदीकरण करून नवीन रस्ता तयार करण्यात येणार असून यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
या कारवाईदरम्यान उप आयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, उप अभियंता अभिमान भोसले, पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक बाबर, बीट निरीक्षक तसेच फ क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण कारवाई पथक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यामधील स्वच्छ सुंदर शहरामध्ये आघाडीवर असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराची वेगाने प्रगती होत असून शहरातील दळणवळण व्यवस्था सुरळीतपणे असणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शहरातील सर्व प्रमुख रस्ते अडथळे विरहीत असणे गरजेचे आहे. शहरामधील प्रमुख रस्त्यांवर किंवा रस्त्यालगत अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाल्यास त्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिला आहे.