अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व आपत्कालीन यंत्रणा दक्ष

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेची सर्व आपत्कालीन यंत्रणा दक्ष असून धोकादायक ठिकाणांची पाहणी करून त्या अनुषंगाने संबंधित विभागांमार्फत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी देखील सतर्क राहावे, असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांवर असलेल्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून ते पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत. तसेच येत्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशावेळी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येत आहे. स्थलांतरित ठिकाणी आवश्यक सुविधा, भोजन तसेच वैद्यकीय सेवा आदी बाबींचे नियोजन आणि व्यवस्थापन देखील करण्यात येत आहे. तसेच पूर परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करून त्यावर संबंधित विभागामार्फत तातडीने उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त चंद्रकात इंदलकर यांनी दिली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकिय विभागामार्फत १६ पथके तयार केलेली असून यापथकांमार्फत नागरिकांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात येत आहेत. जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण, जनजागृती करण्यात येत असून आजारी नागरिकांना औषधोपचार पुरविण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. तसेच जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस एक तास आपल्या घराच्या आतील व बाहेरील पूर्ण परिसराचे परिक्षण करावे पाणी साचणारी सर्व ठिकाणे (डासोत्पत्ती स्थाने) नष्ट करावी.
– डॉ.लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
पावसामुळे काही ठिकाणी राडारोडा व कचरा साठून पाणी तुंबल्याच्या घटना घडत आहेत त्या अनुषंगाने साफसफाई करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात असून त्यांचे काम अविरतपणे सुरु आहे. रस्त्यावर पडलेल्या राडारोड्यामुळे पूरपरिस्थितीत अनुचित प्रकार घडण्याची किंवा अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे संबंधितांनी राडारोडा उचलून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा. तसेच राडारोडा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– अजिंक्य येळे, सहायक आयुक्त, आरोग्य विभाग
पावसाच्या पाण्यामुळे काही चेंबर्स तुंबले असून त्या अनुषंगाने या ठिकाणी संबंधित अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही सुरु आहे. पाणी उपसा यंत्रणेद्वारे पाणी साचलेल्या भागातील पाणी उपसण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. अतिवृष्टीच्या अनुषंगाने रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरु आहेत.
– रामदास तांबे, मुख्य अभियंता, जलनिस्सारण विभाग
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. तरी दक्षतेची खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे.
– श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क राहावे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या अग्निशमन मुख्य नियंत्रण कक्षाच्या ९९२२५०१४७५ किंवा ०२०- २७४२३३३३ तसेच मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्या ०२०- ६७३३११११ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच नागरिकांनी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे.
– ओमप्रकाश बहिवाल, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
चौकट : अतिवृष्टीच्यापार्श्वभूमीवर नागरिकांसाठी सूचना –
अतिवृष्टीच्या अनुषंगाने नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे. कोणीही नदीपात्रात उतरू नये.वीजेचे खांब, डी. पी. बॉक्स, ट्रान्सफॉर्मर अशा विद्युत उपकरणांजवळ जाऊ नये.नदीपात्राजवळ किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये अथवा फोटोग्राफी करू नये.आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.पूरबाधितांसाठी महापालिकेच्या वतीने निवारा केंद्रांची सोय केली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. अफवांवर विश्वास न ठेवता महापालिका व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.नागरिकांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या नियंत्रण कक्षास संपर्क साधावा.













