ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

The social media effect : ‘श्वास गुदमरलेल्या’ दिघी रोडचे रुप पालटणार!

Spread the love

 

सामाजिक कार्यकर्ते ॲड. उत्तम घुगे यांचा विश्वास
– आमदार महेश लांडगे यांचा २४ तासांत ‘रिझल्ट’

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अत्यंत वर्दळीचा दिघी रोडलगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. मात्र,  त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले होते. परिणामी, हजारो नागरिक- वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत होतो. याबाबत ‘सोशल मीडिया’वर टाकलेली एक पोस्ट आणि अवघ्या २४ तासांत आमदार महेश लांडगे यांनी घेतलेली दखल ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते ॲड. उत्तम घुगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

भोसरी-दिघी शिवरस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईन अशा विविध कारणांनी खोदाई झाल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. नागरिक  व वाहनचालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिघी-कळस-बोपखेल आणि विश्रांतवाडी या भागातील नागरिकांना भोसरी आणि पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यासाठी ‘शॉर्टकट’ असलेला हा रस्ता समस्येच्या गर्तेत होता. याबाबत ॲड. उत्तम घुगे यांनी ‘फेसबूक पोस्ट’ लिहीली होती. याची त्वरीत दखल घेत भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘टीम’ ने रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार, ई-प्रभागाचे माजी सभापती विकास डोळस, माजी नगरसेवक सागर गवळी, निर्मला गायकवाड, कार्तिक लांडगे, मनोज गायकवाड, संतोष जाधव यांनी या रस्त्याची तात्काळ पाहणी केली. यावेळी महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. वाडकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ॲड. उत्तम घुगे म्हणाले की,  दिघी रोडच्या दुरावस्थेची समस्या सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावली. ड्रेनेज समस्या, पाणी गळती समस्या आणि रस्त्याची दुरवस्था संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत. अल्पावधीतच म्हणजे २० ते २५ दिवसांत दिघी रोडचे ‘फुगे प्रायमा’ ते ‘गंगोत्री पार्क’ हे काम सिमेंट काॅंक्रेट मध्ये करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे जनतेच्या कोणत्याही समस्येप्रसंगी धावून जाण्यासाठी कटिबद्ध असणारे, लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा त्याच तडफेने पाहायला मिळाले. तसेच,  प्रशासनही जागे असल्याचे समोर आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर लेखास अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिकांनी लाईक आणि कमेंट करत एकी दाखवली आहे.

दिघीरोडचे रूप पालटणार..! होय… ‘दिघी रोडचा दाटून आलेला… कंठ’ या लेखातून दिघी रोड कसा नागरी समस्या बनला आहे? हे वास्तव मांडले होते. सदर लेख पोस्ट होऊन २४ तास पूर्ण होण्याअगोदरच आमदार महेश लांडगे यांनी यांनी स्वतः फेसबुक वाॅलला कमेंट करत समस्या निवारण करण्यासाठी तात्काळ योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. जनतेचे मन जाणणारे आणि ते जपणारे लोकप्रतिनिधी एकवटले होते, ज्यामुळे प्रशासन जागे झाले होते.
– ॲड. उत्तम घुगे, सामाजिक कार्यकर्ते, दिघी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button