महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन व सेवा उपदान लागू
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान देणे तसेच रुग्णता सेवानिवृत्त (वैद्यकीय कारणास्तव निवृत्त) झालेल्या कर्मचा-याला रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान देणे आणि शासन सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान देण्याबाबतच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली आहे.
शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजने अंतर्गत शासन सेवेतून निवृत्त होणा-या कर्मचाऱ्याला सेवा उपदान देण्याबाबतच्या विषयाला आज झालेल्या स्थायी समिती व महापालिका सभा बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
शासन निर्णयानुसार १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील तरतुदीप्रमाणे लाभ देण्यात येणार आहेत. त्यानुसार सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-याला रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे. तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान देण्यात येणार आहे.