पूरग्रस्तांना ५० हजार रुपयांची रोख मदत तातडीने द्या – सीमा सावळे, आशा शेंडगे
पूरग्रस्तांना ५० ह रुपयांची रोख मदत तातडीने द्या
स्थायी समिती माजी अध्यक्षा सीमा सावळे, माजी नगरसेविका आशा शेंडगे यांची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पूरग्रस्तांचे तातडिने पंचनामे करून किमान ५० हजार रुपये रोख, महिन्याचे धान्य, दोन चादरी, दोन ब्लँकेट आणि मुलांना वह्या-पुस्तके मदत स्वरुपात लगेचच द्या, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त आणि हवेली अप्पर तहसिलदार यांना त्याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी दिले.
निवेदनात त्या म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरात बुधवार, गुरूवार पूरपरिस्थिती होती. शहातील पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या किनाऱ्यावरच्या सर्व वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साठले होते. हजारो गोरगरिब कुटुंबांचे संसार अक्षरशः वाहून गेले. मी स्वतः दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरी, बालाजीनगर परिसरातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. हातगाडी, टपरीवाले, धुणे भांडी करणाऱ्या महिला, मोलमजुरी करणारे कष्टकरी भेटले. एकाकी राहणाऱ्या अनेक निराधार आजी-आजोबांची व्यथा ऐकली. अशा सर्व बाधित कुटुंबांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला तेव्हा डोळ्यात अक्षरशः पाणी आले.
महोदय, या सर्व कुटुंबांचे घरातील फ्रिज, टिव्ही, फर्निचर, अंथरूण-पांघरून भिजले. महत्वाची कागदपत्रे भिजल्याने ती निकामी झालीत. घरातील पीठ, साखर, मीठ, अन्नधान्य, मसाले भिजल्याने घरात खायला काही नाही अशी परिस्थिती आहे. सर्व पूरग्रस्तांच्या घरांचे तातडिने पंचनामे करून केले पाहिजेत. ज्या लोंकाना महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाने वाचवले आणि शाळांतून निवारा दिला त्यांची नोंद आपल्या विभागाकडे आहे. खरे तर, अशा प्रसंगी सर्वेक्षणासाठी वेळ लागता कामा नये. आपल्या प्रशासनाने हे काम तातडिचे म्हणूनच पाहिले, असे निवेदनात म्हटले आहे.
शहरातील या सर्व कुटुंबांना सुरवातीला किमान ५० हजार रोख स्वरुपात मदत दिली पाहिजे. महिन्याचे अन्नधान्य तसेच प्रत्येक कुटुंबाला दोन चादरी, दोन ब्लँकेट अशा स्वरुपाची मदत तातडिने दिली पाहिजे. किमान या जनतेला संकटात मदत कऱणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या वह्या-पुस्तके भिजल्याने त्यांची गैरसोय झाली म्हणून त्यांना पुस्तक-वह्या दिल्या पाहिजेत. महत्वाची कागदपत्रे खराब झाल्याने अशा सर्व कुटुंबांना त्यासाठी नागरी सुविधा केंद्राची मदत मिळवून द्यावी, अशीही मागणी सावळे आणि शेंडगे यांनी केली आहे.