मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर रिक्षांद्वारे करणार प्रचार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शहरातील प्रत्येक महिला लाभार्थ्याला घेता यावा यासाठी महापालिका स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. शहरात या योजनेचा प्रचार व प्रसिद्धी रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ आज आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपआयुक्त अण्णा बोदडे, लिपिक अभिजित डोळस, महापालिका कर्मचारी आणि रिक्षाचालक उपस्थित होते.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या सर्व अधिकृत सोशल मिडीया हॅन्डल्स तसेच अधिकृत संकेतस्थळावर योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात येत असून अर्ज करण्याच्या प्रक्रियेची देखील माहिती देण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणी योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी माहितीदर्शक स्टँडीज, फ्लेक्स, बॅनर्स सर्व क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत निश्चित केलेल्या ठिकाणी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पालिकेच्या व्हीएमडीवरही योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त योजनेचे माहितीदर्शक व्हिडीओ, मेसेजेस, जिंगल्स तयार करून प्रसारित करण्यात येत असून योजनेची माहितीदर्शक भित्तीपत्रके लावण्यात येत आहेत. तसेच हस्तपत्रिका आणि पॅम्प्लेट्स तयार करुन घरोघरी वितरित करण्यात येत आहेत.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्रांसह महिला विकास महामंडळाच्या महिलांच्या आधारे ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेऊन त्यानंतर ते अर्ज क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येत आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी १२३ पेक्षा जास्त सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांवर भेट देवून जास्तीत जास्त पात्र महिलांनी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत विहित मुदतीत अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.