सायबर सुरक्षा काळाची गरज – पोलीस निरीक्षक सागर पोमण
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आधुनिक माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाची क्षितिजे विस्तारत आहेत. मात्र या युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यातून आपणाला सुरक्षित ठेवणे काळाची गरज आहे. रिवॉर्ड जिंकलेले आहे असे फोन, फेक फोन कॉल्स, फ्रेंड रिक्वेस्ट येणे, मोफत नोकरीचे अमिष, शेअर मार्केट गुंतवणूक, क्रेडिट कार्ड नंबर मागणे, डेबिट कार्ड मागणे, व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल यासारख्या फेक गोष्टींच्या मार्फत फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप यांच्या माध्यमातून जनतेची फसवणूक होताना दिसत आहे. तरुण पिढीही त्याला बळी पडताना दिसते. त्यामुळे स्ट्रॉंग पासवर्ड ठेवणे, तो ठराविक काळानंतर बदलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक (गुन्हे अन्वेषण) मा. सागर पोमण यांनी केले.सूचना, माहिती आणि प्रसारण खाते यांच्या अंतर्गत पुणे आकाशवाणी आणि महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकास यात्रा’ अंतर्गत आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत समाजात जाणिवजागृती होणे गरजेचे आहे. ट्रेडिंग फ्रॉड, विवाहविषयक संकेतस्थळे, कमी वेळेत पैसे दुप्पट करण्याचे अमिष, फोटो शेअर करणे, व्हिडिओ शेअर करणे या आणि यासारख्या विविध माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक होताना दिसते. अशावेळी महाविद्यालयीन तरुणांनी त्यासंदर्भात जनजागृती करून समाजाचा दिशादर्शक स्त्रोत बनावे, असा मनोदय प्राचार्य प्रो. (डॉ). माधव सरोदे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी मा. विक्रांत मंडपे यांनी केले. कार्यक्रमास आकाशवाणीचे उद्घोषक कैलास शिंदे, अभियंता प्रसाद कराडकर, उपप्राचार्य डॉ. मृनालिनी शेखर, डॉ. नीलकंठ डहाळे, डॉ. दत्तात्रय हिंगणे, पर्यवेक्षक प्रा. रूपाली जाधव, प्राध्यापक, पदवी- पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रो. डॉ. कामायनी सुर्वे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनल बावकर, डॉ. प्रतिमा कदम यांनी केले.