मुसळधार पावसाचा फटका; पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांना उद्या (२६ जुलै २०२४) रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी उद्या देण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ जुलै व २६ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २६ जुलै २०२४ रोजी बंद ठेवणे आवश्यक आहे.
तसेच खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करणे आवश्यक आहे.
त्यानुसार भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्याना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करीत असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी म्हटले आहे.