ताज्या घडामोडीपिंपरी

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे – आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. शिवाय धरणक्षेत्रातून या नद्यांमध्ये वेळोवेळी होणारा विसर्ग लक्षात घेता नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यभागातून पवना नदी वाहते. पवना धरण क्षेत्रातील पावसाचा वाढता जोर आणि पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी ४ वाजता पवना जलविद्युत केंद्रामधून विद्युत गृहाद्वारे १४०० क्युसेक क्षमतेने विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला असल्याची माहिती पवना धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. पावसाचे प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेता आवश्यकतेनुसार या विसर्गामध्ये रात्रीच्या सुमारास वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नदीकाठावर वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांनी सतर्क रहावे. तसेच मुळा नदी वाकड, पिंपळेनिलख, सांगवी, पिंपळेगुरव, दापोडी, बोपखेल आदी भागातून वाहत जाते. या नदीमध्ये मुळशी धरणाच्या सांडव्यावरून सुमारे ७५०० क्युसेक्सने विसर्ग सायंकाळी ५ वाजता करण्यात आल्याची माहिती मुळशी धरण कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. मुळा आणि मुठा नदीचा संगमाच्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने मुळा नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत अधिक वाढ होते. अशा परिस्थितीत या नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांनी दक्ष राहणे गरजेचे असून वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिका  प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या ०२०-६७३३११११ किंवा ०२०-२८३३११११ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

          महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली जात आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे २८०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले असून याठिकाणी भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी तसेच निवारा केंद्रांवर भेट देऊन आढावा घेतला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती पाहता आयुक्त शेखर सिंह यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलवून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. एनडीआरएफ दलाशी आयुक्त शेखर सिंह यांनी संपर्क साधला असून संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ तुकडीला शहरात पाचारण करण्यात आले आहे. शिवाय बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप, औंध ब्रिगेड यांच्याशी आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला असून या यंत्रणांना देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, शहरात विविध ३९ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून आपत्कालीन यंत्रणा आणि उद्यान विभागाद्वारे तातडीने कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. बचावकार्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलासह आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित असून पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना काही ठिकाणी बोटीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. संपुर्ण परिस्थितीवर मुख्य नियंत्रण कक्षाद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून आयुक्त शेखर सिंह प्रत्येक घटनेचा आढावा घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button