किटकजन्य आजार पसरू नयेत यासाठी औष्णिक धुरीकरण करा नागरिकांनी मांडल्या जनसंवाद सभेत सूचना
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेंग्यूला शहरातून हद्दपार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड शहर अर्थात “बीट डेंग्यू’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये घराच्या आजूबाजूच्या परिसरात डासांची निर्मिती होऊ न देणे, डेंग्यू आणि इतर किटक कीटकांपासून होणार्या आजाराची माहिती असणे, आपल्या आजुबाजुला डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या रुग्णालयांना कळवणे, आपले घर आणि परिसरात कोठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे आणि पाणी साठवणूक करणारे पात्र कोरडे करणे राखणे या उपाययोजनांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी डेंग्यूपासून स्वत:चे आणि कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी आणि अभियान यशस्वी करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेच्या माध्यमातून करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करण्यात येते. त्या अनुषंगाने असलेली नागरिकांची महापालिकेच्या संदर्भातील कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना कार्यवाही करण्याच्या सूचना आज झालेल्या जनसंवाद सभेत देण्यात आल्या. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून कामकाज पाहिले.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत सहभागी झालेल्या नागरिकांना डेंग्यू तसेच इतर किटकजन्य आजारांपासून बचावाच्या उपाययोजना करण्याबाबत तसेच आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूबाबत जनजागृती करण्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जनसंवाद सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी डेंग्यूपासून स्वत:चे आणि कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन महापालिकेला दिले.
नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न जलद गतीने सोडविण्यासाठी जनसंवाद सभा हे प्रभावी माध्यम आहे. आज या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन विविध तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १४, ८,२,४,१,५,१० आणि ४ अशा एकूण ४८ तक्रार वजा सूचना मांडल्या. यामध्ये पावसाळ्यात रस्त्यावर साठलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम जलद गतीने करावे, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्यात याव्यात, किटकजन्य आजार पसरू नयेत यासाठी औष्णिक धुरीकरण करण्यात यावे, अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे दुरुस्त करण्यात यावेत, नाल्यांमध्ये आणि गटारांमध्ये पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी, फुटपाथवरील अतिक्रमण हटवावे अशा विविध सूचनांचा समावेश होता.