चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

“शिक्षकाचा आवाज हा मातृत्वाचा आवाज असतो!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “शिक्षकाचा आवाज हा मातृत्वाचा आवाज असतो!” असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चिंचवड   येथे  व्यक्त केले.

गुरुपौर्णिमेनिमित्त कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवी आयोजित गुरुगौरव विशेष पुरस्कार प्रदान आणि गुरुजन सन्मान सोहळ्यात गिरीश प्रभुणे बोलत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे, कोल्हापूर येथील माजी शिक्षण सहसंचालक मकरंद गोंधळी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची व्यासपीठावर तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, तानाजी एकोंडे, शाहीर आसराम कसबे, नटराज जगताप, डॉ. हेमलता सोळवंडे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. याप्रसंगी निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना दीक्षित आणि पिंपरी – चिंचवड क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य जयराज वायळ यांना कलारंजन गुरुगौरव विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच रवींद्र शिंदे, वंदना इन्नाणी, नीलेश भोसले, प्रमोद राठोड, वैशाली वेदपाठक, दयानंद यादव, प्रमोदिनी बकरे, मारुती वाघमारे, जयश्री राऊत, नेहा काळे या गुरुजनांना सन्मानित करण्यात आले.

गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “भारतीय संस्कृतीतील व्यास आणि वाल्मीक या व्यक्तिरेखा सामान्य कुळातील असूनही त्यांना गुरुंचे स्थान देण्यात आले होते; परंतु ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीने भारतीयांना सांस्कृतिकदृष्ट्या निद्रिस्त अवस्थेत ठेवले. ही परिस्थिती बदलण्याचे आव्हान पेलून शिक्षकांनी ‘गुरू’ या संकल्पनेची व्याप्ती अन् गरिमा वृद्धिंगत केली पाहिजे!” डॉ. शकुंतला काळे यांनी, “औपचारिक शिक्षण व्यवस्थेपूर्वी आपल्या देशात गुरुकुलांचे स्थान अनन्यसाधारण होते. सद्यस्थितीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील अंत:प्रेरणा जागृत करावी!” असे आवाहन केले. मकरंद गोंधळी यांनी, “मानवी जीवनात आई हा पहिला आणि निसर्ग हा दुसरा गुरू असतो. शिक्षकांनी अध्यापन करताना आपल्या आवाजाचा प्रभावी वापर करावा!” अशी अपेक्षा व्यक्त केली. पुरस्कारार्थींनी प्रातिनिधिक मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविक केले. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे कार्यवाह आर. बी. पाटील यांनी आभार मानले. संग्रामसिंह पाटील या विद्यार्थ्यांने सादर केलेल्या शिवगर्जनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button