‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी शिबीराचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड शहरात करण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध ठिकाणी १२३ केंद्रे असून या सर्व अर्जस्विकृती केंद्रांवर समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर (संगणक चालक), मदतनीस, सुरक्षा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी महापालिका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे.
योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या सर्व अधिकृत सोशल मिडीया हॅन्डल्स तसेच अधिकृत संकेतस्थळावर योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असून अर्ज करण्याची प्रक्रियेची देखील माहिती देण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणी योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी माहितीदर्शक स्टँडीज, फ्लेक्स, बॅनर्स सर्व क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत निश्चित केलेल्या ठिकाणी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पालिकेच्या व्हीएमडीवरही योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त योजनेचे माहितीदर्शक व्हिडीओ, मेसेजेस, जिंगल्स तयार करून प्रसारित करण्यात येत असून योजनेची माहितीदर्शक भित्तीपत्रके, हस्तपत्रिका आणि पॅम्प्लेट्स तयार करण्यात येत आहे.
महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, करसंकलन विभागीय कार्यालये आदी ठिकाणी अर्ज स्विकृती केंद्र चालू करण्यासाठी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्ज स्विकृती केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली असून शिबिरासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर शिबिराच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने गर्दीचे योग्य नियोजन करून त्यानुषंगाने कार्यवाही करण्यासाठी एम.एस.एफ जवान तसेच सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. योजनेच्या अटी शर्ती, पात्र अपात्र यांचे निकषांची माहिती लाभार्थींना देण्यासाठी तसेच पात्र महिलांच्या कागदपत्रांची छाननी, दैनंदिन अहवाल आदी बाबींची पुर्तता करण्यासाठी केंद्रांवर व्यवस्थापक, मुख्य लिपीक, समुह संघटक, समुदाय संघटक, मदतनिस यांची नेमणूकही करण्यात आली आहे, जेणेकरून लाभार्थी महिलांना योजनेबद्दल तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची, पात्र, अपात्रतेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. केंद्रांवर येणाऱ्या अर्जदारांच्या सोयीसाठी फिरते शौचालय, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून दैनंदिन साफसफाई करण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर योग्य समन्वयासाठी नोडल अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी यांना कामकाज सोपविण्यात आले असून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.