ताज्या घडामोडीपिंपरी

“मातृत्व हे विश्वात्मक असते! – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “ज्याप्रमाणे दुःख हे डावे – उजवे नसते, त्याप्रमाणे मातृत्व हे विश्वात्मक असते. ते जात, धर्म या पलीकडचे असते. ‘थोरांच्या पाऊलखुणा’मधील नायक हे सर्व जातीधर्माचे प्रतिनिधित्व करतात!” असे विचार प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
आशिया मानवशक्ती विकास संस्था – पुणे आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आई कृतज्ञता सोहळा तसेच बाजीराव सातपुते लिखित ‘थोरांच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव सातपुते, ज्येष्ठ प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आई कृतज्ञता सोहळ्यांतर्गत कमल खांदवे, राणूबाई उमाप, वत्सलाबाई सातपुते, विमल मरळे, सुभद्रा वाल्हेकर या मातांना राजमाता जिजाऊ कृतज्ञता सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, ग्रंथ आणि शाल असे सन्मानाचे स्वरूप होते.
पुरुषोत्तम सदाफुले यांनी सन्मानार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “‘थोरांच्या पाऊलखुणा’मधील व्यक्तिचित्रण प्रत्ययकारी आहे!” असे गौरवोद्गार काढून, “जिजाऊ या केवळ राजमाताच नव्हत्या तर त्या राष्ट्रमाता होत्या. देव, देश, धर्म, महिला आणि संस्कृती यांच्यासाठी अत्यंत प्रतिकूल काळात त्यांनी महाराष्ट्रधर्म जागवला!” असे विचार मांडले. सुदाम भोरे यांनी, “मातांचा सन्मान करण्याएवढे आपण मोठे नाहीत; पण यानिमित्ताने त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली!” अशी भावना व्यक्त केली. नितीन हिरवे यांनी, “आज सभागृहात पंढरी अवतरली आहे!” असे मत व्यक्त केले. बाजीराव सातपुते यांनी प्रास्ताविकातून, “हयात असताना असंख्य माता सन्मानापासून वंचित राहतात म्हणून आज आवर्जून प्रातिनिधिक मातांना सन्मानित करण्यात येत आहे!” अशी भूमिका मांडली. रविराज इळवे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “आजही समाज चांगुलपणाची पाठराखण करतो!” असे प्रतिपादन केले.
सुवासिनींच्या हस्ते पाचही मातांचे पूजन करून तसेच ओवी सातपुते या चिमुरडीच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मानसी चिटणीस यांनी मानपत्राचे वाचन केले. अरुण गराडे, राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघोले, जयवंत भोसले, फुलवती जगताप यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सायली संत यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button