ताज्या घडामोडीपिंपरी
राजन लाखे यांचा ‘बकुळगंध’ विद्यापीठ अभ्यासक्रमात

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला ( एफ. वाय. बी. ए.) वर्गातील मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात लेखक कवी राजन लाखे यांचा शान्ता शेळके जन्म शताब्दी ग्रंथ – बकुळगंध समाविष्ट करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने या ग्रंथास संदर्भग्रंथ म्हणून मान्यता दिली आहे.
शान्ता शेळके यांच्या साहित्याशी निगडित असलेले तसेच त्यांच्याशी संबंधित असलेले, महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील १०० मान्यवरांनी त्यांच्या साहित्यावर केलेले भाष्य, त्यांनी सांगितलेल्या साहित्यिक आठवणी आणि मानवंदना म्हणून शान्ता शेळके यांना अर्पण केलेल्या त्यांच्याच कविता असा एकूण १०० मान्यवर, १०० साहित्यभाष्य, १०० आठवणी, १०० कवितांचा साहित्यठेवा असलेल्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची निवड मराठी अभ्यास मंडळाने केली असून सदर ग्रंथ शान्ता शेळके यांच्या साहित्यावर पी. एचडी. करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने राबवलेल्या प्रकल्पातून या ग्रंथाची निर्मिती झाली असून नुकतीच त्याची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे.













