‘मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवा! युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांची मुख्यमंत्र्यांना निवेदन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी निश्चित करण्यात आलेला कालावधी हा अत्यंत कमी असून त्यामुळे राज्यातील लाखो गरजू महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली आहे.
यासंदर्भात चंद्रशेखर जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
निवेदनात जाधव यांनी म्हंटले आहे की, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर कालपासून ( दि. १ जुलै) महाराष्ट्रभर अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी प्रत्येक ठिकाणी उसळलेली दिसून येत आहे. मात्र कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत आहे. विशेषतः उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल आणि रहिवाशी दाखला काढण्यासाठीही सेतू केंद्रावरही मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. मात्र कोणतेही कागदपत्रे काढण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या कालावधीत ही अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणे अशक्य असल्याने महिलांमध्येही चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने सदर योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ द्यावी, जेणेकरून राज्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी विनंती चंद्रशेखर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.