ताज्या घडामोडीपिंपरी

पावसाळी अधिवेशन : भोसरी मतदार संघातील प्रस्तावित रस्त्यांना ‘गती’

Spread the love

 

महसूल मंत्री विखे-पाटील यांचे प्रस्ताव मान्य करुन घेण्याचे आदेश
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रस्तावित रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणेकामी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव मान्य करुन घ्यावा, असे आदेश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे भूसंपादनाअभावी रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागण्याच्या प्रक्रियेतला गती मिळणार आहे.

मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्री विखे-पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी रस्त्यांच्या कामांसाठी भूसंपादन हा प्रमुख अडथळा असून, त्या करिता निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली.

भोसरी विधानसभा मतदार संघातील वाहतूक सक्षम व्हावी आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी. या करिता आम्ही मुख्य रस्त्यासोतबतच काही अंतर्गत डीपी रस्तेही विकसित करण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. सदर रस्त्यांचे कामे भूसंपादनाअभावी रखडली आहेत. तर भूसंपादन निधीअभावी लांबणीवर पडले आहे. त्यासाठी चऱ्होली गावातील अंतर्गत 18 मीटर व 30 मीटर रस्त्याचे भूसंपादन, मोशी, चोविसावाडी, वडमुखवाडी व चऱ्होली येथील 90 मीटर रुंद रस्ता भूसंपादन, तळवडे व चिखली भागातून जाणारे ७ रस्ते विकसित करणेसाठी भूसंपादन, इंद्रायणी नदी किनारी तळवडे, चिखली, डुडूळगाव, बोऱ्हाडेवाडी, मोशी व चऱ्होली भागातून जाणाऱ्या रस्त्याचे भूसंपादन करणे, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पासाठी जागेचे भूसंपादन करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली. त्याला महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
*****
पिंपरी-चिंचवडसाठी दोन पशू वैद्यकीय अधिकारी…
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे २० ते २५ हजार लहान-मोठी जनावरे आहेत. या जनावरांना मनपा हद्दीमध्ये महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत दोन पशू वैद्यकीय अधिकारी प्रतीनियुक्तीने देण्याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सूचना केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापन होण्यापूर्वी चऱ्होली येथे जिल्हा परिषद मार्फत पशु शल्यचिकीत्सालय सेवा पुरवली जात होती. मात्र, महापालिकेच्या स्थापनेपासून अशी सुविधा नाही. दोन पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्यास पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.

तलाठी कार्यालयासाठी प्रस्ताव देण्याचे आदेश…
राज्य शासनाच्या महसूल विभागाने दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेलया तलाठी साझे व महसूल मंडळाकरिता पदनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, चिंचवड तलाठी कार्यालयाचे विभाजन करुन निगडी, तसेच, देहू, भाेसरी, मोशी असे नवीन मंडळ निर्माण केले आहेत. चिखली, बोऱ्हाडेवाडी, तळवडे, भोसरी-१, भोसरी-२, दिघी, बोपखेल, मोशी, डुडूळगाव, चऱ्होली बु. चोविसावाडी, वडमुखवाडी या तलाठी मंडळ कार्यालयांकरिता हक्काची जागा आणि इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. यावर सदर जागेकरिता प्रस्ताव सादर करावा, असे आदेश महसूल मंत्री विखे-पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button