ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी

नारायण बहिरवाडे यांना “समाजभूषण पुरस्कार

Spread the love

महात्मा बसवेश्वर हे लोकशाहीचे आद्य प्रवर्तक – डॉ. श्रीपाल सबनीस

 

निगडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-“महात्मा बसवेश्वर हे लोकशाही समाज व्यवस्थेचे आद्य प्रवर्तक असून समतेच्या विचारांचे पहिले पुरस्कर्ते आहेत. त्यांचे विचार लोकशाही व्यवस्था, नवसमाजनिर्मिती आणि शोषणमुक्त समाजासाठी पूरक आहेत. भौतिकतावादी विचार आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचा व्यापक समन्वय बसवेश्वरांच्या कार्यकर्तृत्वात आढळून येतो. लोकशाही शाबूत ठेवायचीअसेल तर बसवेश्वरांचे विचार सर्व दूर पोहोचवले पाहिजेत.” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. सकल लिंगायत समाज यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यामध्ये “महात्मा बसवेश्वरांचे कार्य” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प किसन महाराज चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे, साहित्यिक राजेंद्र घावटे, अण्णाराय बिरादार, शिवाजी साखरे, चंद्रशेखर दलाल, बसवराज कुल्लोळी, माजी उपमहापौर शैलजा मोरे हे उपस्थित होते.
याप्रसंगी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांचा “समाज भूषण” पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या मानपत्राचे वाचन राजेंद्र कोरे यांनी केले.

सलग तिसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल श्रीरंग बारणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, ” बसवेश्वरांच्या विचारांची उंची विश्व मानवतेचा संदेश देते. त्यांनी स्थापन केलेली संसद ही जगातील पहिली संसद आहे. म्हणून ते लोकशाहीचे पहिले उद्गाते ठरतात. सर्व जाती, पंथांच्या लोकांना एकत्र करून त्यांनी कर्मठपणा,जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीपुरुष असमानता आदींवर प्रहार केला.

महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद, मानवेंद्रनाथ रॉय, बी.डी. जत्ती, न्यायमूर्ती गजेंद्रगडकर, यशवंतराव चव्हाण, विनोबा भावे, न्यायमूर्ती रानडे, यांनी बसवेश्वरांच्या समाजोद्धाराच्या कार्याचा विशेष गौरव केलेला आहे. बुद्ध महावीरांचे तत्त्वज्ञान आणि संतांचा विश्वात्मक विचार यांचा समन्वय बसवेश्वरांच्या विचारांमध्ये आढळतो. त्यांच्या सामाजिक पुनरुत्थानाच्या कार्याने जगाला प्रभावित केलेले आहे.”

याप्रसंगी दहावी बारावी आणि विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला किसन महाराज चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश वाळके यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button