पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए ) च्या आयुक्तपदी योगेश म्हसे यांची नियुक्ती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘होल्ड’ कायम आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह ‘पीएमआरडी’च्या अंतर्गत प्रलंबित कामांना गती देण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ केला आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारांसमोर ‘डेव्हलपमेंट ॲन्ड डेडिकेशन’ असा अजेंडा ठेवण्यात आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या आयुक्तपदी राहुल महिवाल यांच्याजागी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए ) आयुक्त पदी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (२७ जून) ही नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी योगेश म्हसे यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र जारी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून सनदी अधिकारी योगेश म्हसे यांची ओळख आहे. पुण्यात त्यांची नियुक्ती करुन पुणे, पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीए हद्दीतील प्रलंबित विकासकामे आणि प्रकल्पांना चालना देण्याची भूमिका घेण्यात येणार आहे. त्याद्वारे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील वर्चस्व कामय ठेवण्याचा संकल्प आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकार क्षेत्र पीएमआरडीएच्या अधिकारात येते. त्यामुळे या दोन्ही शहरांची संबंधित अनेक प्रश्न मार्गी लावता यावेत. रिंगरोड, नदी सुधार प्रकल्प, विकास आराखडा यासह ग्रामीण भागातील विविध विकास प्रकल्प मार्गी लावता यावेत. या करिता पीएमआरडीएचे नवनिर्वाचित आयुक्त योगेश म्हसे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला बळ मिळेल, असा दावा केला जात आहे.