‘योगासन’ हा केवळ व्यायाम नाही, तर निसर्गाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे’ – अनिता संदीप काटे

चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग मन व शरीर, विचार व कृती, संयम व पूर्णता, मनुष्य व निसर्ग यांच्यातील ऐक्याला मूर्त रूप देतो. आरोग्य व स्वत:च्या कल्याणसाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्राप्त करून देतो. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे, असं प्रतिपादन चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपसंचालिका अनिता संदीप काटे यांनी केलं.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ शुक्रवारी (दि. २२) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनिता काटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी शाळेचे संचालक संदीप काटे, उपसंचालिका लीना काटे, योग शिक्षिका मोनिका सासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योगाविषयी माहिती, प्रात्यक्षिक व सराव करून दाखविला. यावेळी शाळेतील मुलांनी विविध योगासने तसेच इतर कार्यक्रमांची चित्तवेधक प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थितांनी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व थोडक्यात विषद केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा महाले आणि शाळेच्या शिक्षकांनी उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. योगशिक्षिका प्रीती मुकाटी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. जान्हवी जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.












