भाजीविक्रेत्या महिलेस शहरातील फेरीवाल्यांचे समर्थन- काशिनाथ नखाते
अतिक्रमण पथकाकडून झालेल्या मारहाणीचा फेरीवाल्यांनी केला निषेध
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून व एमएसएफ जावानाकडून दापोडी येथे भाजीविक्रेत्या रेश्मा कांबळे यांना अमानुष मारहाण करण्यात आली, याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत त्यांचा व्यवसाय व त्यांची कायदेशीर लढाई लढण्यासाठी शहरातील सर्व फेरीवाल्यांचा समर्थन राहील असा विश्वास कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज घटनास्थळी जाऊन मारहाण झालेल्या महिलेची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.यावेळीकार्याध्यक्ष इरफान चौधरी,ज्ञानेश्वर शेळके ,रॉबिन गजभिव, दीपक साळवे,संदेश बोर्डे,रवींद्र कांबळे, हनुमंत कसबे, जगन्नाथ काटे,ओमप्रकाश मोरया, अंबालाल सुखवाल, मनोज यादव,गौतम कांबळे,मुकेश सूर्यवंशी, दत्ता चौधरी,शिवाजी कांबळे,सिकंदर सूर्यवंशी,अर्चना कुटे आदी उपस्थित होते.
फेरीवाला कायद्याची अमलबजावणी न करता अत्यंत चुकीच्या पद्धतीने मारहाण करून फेरीवाला घटकाला संपवण्याचा प्रयत्न आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे हे हडपशाही व दादागिरी पद्धतीने करत आहेत. यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य फेरीवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मोठमोठ्या प्लॉटवरील अतिक्रमण तसेच सरकारी जागेवरील अतिक्रमणाला आयुक्त व अतिरिक्त आयुक्त अभय देऊन त्यांच्यावर अजिबात कारवाई करीत नाहीत. मात्र गरिबांना, फेरिवल्यानां छळले जात आहे. वास्तविक कायद्याची अंमलबजावणी न करता अशा पद्धतीने कारवाई करून जर फेरीवाला हटाव मोहीम करण्यात येणार असेल तर त्याला तेवढाच प्रतिकार करण्यात येईल. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे शहरातील जनतेला वाऱ्यावर सोडून बिनधास्तपणे देशात आणि विदेशात पर्यटन करीत आहेत.शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, आरोग्य, असो की बेकायदेशीर होर्डिंग चा प्रश्न असो सर्व ठिकाणी प्रशासन अपयशी ठरले आहे.