बांधकाम कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवा – काशिनाथ नखाते
मुख्यवित्त व लेखा अधिकारी यांची मुंबईत भेट घेउन चर्चा
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगाराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकसभेच्या आचारसंहितेपासून सर्व अर्ज प्रलंबित असल्याने त्यांना वेगवेगळ्या योजनांचे लाभ मिळत नाहीत आणि बांधकाम कामगारांचे महामंडळ सूस्त झाले आहे त्यास जलदगती देऊन तातडीने प्रश्न सोडवा अशी मागणी मुख्यलेखा व वित्त अधिकारी धनाजीराव शिंदे यांच्याकडे केली अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज दिला.
मुंबई येथील महामंडळाच्या मुख्यालयात कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देण्यात आले, यामध्ये राजेश माने, कॉ.शंकर पुजारी, सागर तायडे, सुनील पाटील, विनिता बाळेकुंद्री,रतिवकुमार पाटील,मंगेश कांबळे यांचा समावेश होता.
लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यापासून ते १० जून पर्यंत पूर्णतः काम ठप्प होते, आता मंडळाच्या कामकाजावरती ताण पडलेला असून तो कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची वाढ करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दर दिवसाला फक्त १०० अर्ज स्वीकृतीची अट अत्यंत चुकिची आहे ती रद्द करा या मागणीनुसार ही अट रद्द करण्यात आली आहे असे त्यानीं नमूद केले.
बांधकाम कामगारांचे इतर लाभाचे अर्ज प्रलंबित असून त्यांना कागदपत्रे तपासण्यासाठी खुप उशिराची तारीख दिली जाते आहे ,त्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित राहून पुन्हा एकदा बोजा वाढणार आहे.
दरम्यान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार आज उपस्थित नव्हते, त्यांचे सोबत लवकरच बैठकीचे आयोजन करावे,शिष्यवृत्ती, घरकुल, सुरक्षा साधने असे सर्व लाभ एका महिन्याच्या आत मंजूर करून घेण्यात यावेत, मृत बांधकाम कामगारांच्या लाभ देण्यासाठी जलद गतीने अर्ज निकाली काढण्यात यावेत या मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.लवकरच बैठकीचे आयोजन करुन चर्चा घडवून आणणार असल्याचे त्यानी सांगितले.