ठेकेदार, कंत्राटदारांना सोबत घेऊन निवडणुका जिंकता येत नाहीत – यशवंत भोसले
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ठेकेदार, कंत्राटदार यांना सोबत निवडणुका जिंकता येत नाहीत श्रमिक आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्या जिंकता येतात अशी टीका भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भोसले यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील महायुती सरकारवर केली आहे. यशवंत भोसले हे पत्रकार परिषदेत बाेलत हाेते.
यशवंत भोसले म्हणाले गेल्या १० वर्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी साधी वेळ देखील दिली नाही. आता तरी राज्यातील भाजप नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं तरच आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत यश मिळवता येईल असा भाजपला घरचा आहेरच यशवंत भोसलेनी दिला.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आलेल्या अपयशाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्याबद्दल यशवंतभाऊंनी एकीकडे त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे सत्तेत असताना ठेकेदार व कंत्राटदार यांना सोबत घेऊन काम करत होते अशी टीका केली.
यशवंतभाऊ म्हणाले मतदार हा कुणाचा नसतो. जी सरकार मतदारांचे प्रश्न मार्गी लावते त्या सरकारला मतदार मतदान करत असतात. मात्र महायुती सरकार मध्ये श्रमिक आणि कष्टकरी मतदारांचे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडवता आले नाही. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याचे यशवंत भोसलेंनी नमूद केले.